क्रांतिसूर्याला अभिवादन! चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज दादरच्या चैत्यभूमीवर देशभरातून भीमसैनिकांचा निळा जनसागर लोटला. लाखो अनुयायांनी शिस्तीचे दर्शन घडवत क्रांतीसूर्याला अभिवादन केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी केवळ मुंबई-महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱयातून लाखो अनुयायी येत असतात. आज डॉ. आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदल्या दिवसापासून भीम अनुयायांचे जथेच्या जथे दाखल झाले. सकाळीच राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी चैत्यभूमीवर येऊन महामानवाला वंदन केले.

लाखो अनुयायी आपल्या कुटुंबकबिल्यासह चैत्यभूमीवर आले होते. यामध्ये तरुणांसह आबालवृद्ध व लहानग्यांची संख्याही मोठी होती. मिळेल त्या मार्गाने चैत्यभूमीवर आलेल्या लाखो अनुयायांनी यावेळी आपल्या लाडक्या भीमरायाला अभिवादन केले. विविध सामाजिक संस्थांच्या वतीने खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात आले.

पालिकेची चोख व्यवस्था, पोलिसांचा कडक पहारा

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सर्व नागरी सुविधा करण्यात आल्या होत्या. लाखोंचा जनसमुदाय चैत्यभूमीवर येणार असल्याने कोणाताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनीही कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. समता सैनिक दलासह विविध संस्था, संघटनांचे स्वयंसेवक, चळवळीतील कार्यकर्ते पोलिसांबरोबर तैनात होते. विविध संस्था, संघटनांच्या वतीने  भीमसैनिकांसाठी मोफत अन्नदान, पाणी, चहा वाटप तसेच खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. अनुयायांनीदेखील शिस्तीने रांगा लावून बाबासाहेबांना अभिवादन केले.

पुस्तके, प्रतिमा, मूर्तींची मोठी खरेदी

भीमसैनिकांनी नेहमीप्रमाणे यंदाही मोठय़ा प्रमाणात पुस्तके, बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या प्रतिमा-मूर्तींची खरेदी मोठय़ा प्रमाणात केली.

 

ईव्हीएम हटाव, संविधान बचाव

यावेळी काही संघटनांच्या वतीने ईव्हीएम घोटाळ्याची पोलखोल करून नागरिकांना ‘ईव्हीएम हटाव’बाबत जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय बाबासाहेबांनी लिहीलेले संविधान धोक्यात आले असून संविधानाचा बचाव करण्यासाठी आता सर्वांनी एकवटले पाहिजे याबाबतही प्रबोधन करण्यात आले.

पथनाटय़ातून स्मरण

यावेळी अनेक शाहीर जलसाकार व कलावंतांनी दिवसभर महामानवाच्या कार्याचे स्मरण केले. खेडय़ापाडय़ातून आलेल्या ज्येष्ठांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

चैत्यभूमी, स्वच्छभूमी

छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्था आणि अन्य तरुण तरुणींनी स्वंयस्फूर्तीने पुढाकार घेत चैत्यभूमी व मैदान परिसर  स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका कर्मचाऱयांबरोबर स्वच्छता मोहीम राबवली.