सामना अग्रलेख – अणुयुद्धाची धमकी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रचंड महागाई, जर्जर झालेली अर्थव्यवस्था यामुळे पाकिस्तानची गोरगरीब जनता नरकयातना भोगत आहे. देश चालविण्यासाठी आणि सरकारी कर्मचाऱयांच्या वेतनासाठीही सरकारला कसरत करावी लागत आहे. या आर्थिक चणचणीमुळे अमेरिका, चीन, अरब राष्ट्रांपासून ते जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपर्यंत सगळीकडेच इम्रान खान मदतीसाठी भिकेचा कटोरा घेऊन गेले काही महिने सातत्याने याचना करीत आहेत. पाकिस्तानात सर्वत्र अशी भीषण परिस्थिती असतानाही पंतप्रधान इम्रान खान यांनी हिंदुस्थानला अणुयुद्धाची अप्रत्यक्ष धमकी द्यावी, हा पोरकट आणि हास्यास्पदच प्रकार म्हणायला हवा!

जगभरातील लहान-मोठे सारेच देश विकास आणि प्रगतीच्या वाटेवर घोडदौड करण्यासाठी लक्ष केंद्रित करत असतानाच पाकिस्तान मात्र अजूनही डबक्यातून बाहेर पडायला तयार नाही. दहशतवाद, युद्ध, जिहाद, घुसखोरी, घातपाती कारवाया आणि सतत हिंदुस्थानविरोधी षड्यंत्रे या त्याच त्या गलिच्छ चिखलात पुनः पुन्हा लोळून पाकिस्तानने स्वतःच आपली प्रतिमा ‘युद्धखोर देश’ अशी बनविली आहे. आताही पाकिस्तानने तीच चूक केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कश्मीरच्या मुद्दय़ावरून हिंदुस्थान-पाकमध्ये अण्वस्त्र युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एका अर्थाने कश्मीरचा प्रश्न सुटला नाही तर अणुयुद्धाचा भडका उडेल, अशी अप्रत्यक्ष धमकीच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिली आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने खरे तर जबाबदारीने बोलायला हवे. आपल्या वक्तव्याचे, वर्तनाचे किंवा कृतीचे काय पडसाद उमटतील, जागतिक पातळीवर त्याच्या काय प्रतिक्रिया उमटतील, याचा सारासार विचार करूनच कुठल्याही राष्ट्रप्रमुखाने भाष्य करायला हवे, असे संकेत आहेत. मात्र, पाकिस्तानच्या आजवरच्या राज्यकर्त्यांनी जी पोरकट विधाने करून आपले हसे करून घेतले, त्याच बेताल बडबडीची परंपरा इम्रान मियाँनी पुढे चालवली आहे. ‘जीओ टीव्ही’ या वृत्त वाहिनीला इम्रान खान यांनी अलीकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत इम्रान यांनी

कश्मीरच्या मुद्दय़ावरून

हिंदुस्थान-पाकमध्ये अण्वस्त्र युद्ध होण्याची भीती व्यक्त केली. जोपर्यंत कश्मीरचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत अण्वस्त्र्ा युद्धाची भीती कायम असेल, अशी दर्पोक्ती इम्रान मियाँनी केली. हिंदुस्थानात माझे अनेक मित्र आहेत. त्यामुळे इतर कोणापेक्षाही हिंदुस्थानला मी अधिक चांगला ओळखतो, असे विधानही इम्रान यांनी केले. इम्रान खान खरोखर हिंदुस्थानला चांगले ओळखत असतील तर यापूर्वी जेव्हा जेव्हा पाकिस्तानने हिंदुस्थानवर युद्ध लादले, त्या प्रत्येक युद्धात पाकिस्तानला सपाटून मार खावा लागला, हेदेखील इम्रान यांना ठाऊक असायलाच हवे. ‘हिंदुस्थानने एक पाऊल पुढे टाकले तर आम्ही दोन पावले पुढे येऊ,’ असे आपण सत्तेवर आल्यानंतर हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते, असे इम्रान यांनी या मुलाखतीत म्हटले आहे. मुळात पाकिस्तानी लष्कराने ‘ऊठ’ म्हटलं की उठणाऱया आणि ‘बस’ म्हटले की, बसणाऱया इम्रान खान यांच्या तोंडी पावले पुढे-मागे घेण्याची भाषा शोभते तरी काय? पाकिस्तानातील गरिबी, सरकारची रिकामी झालेली तिजोरी, पाकिस्तानमधील प्रचंड बेरोजगारी, तेथील नागरिकांची विपन्नावस्था, पाकिस्तानची उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था, भिकेला लागलेला देश अशी आंतरराष्ट्रीय पातळीवरील लाजिरवाणी प्रतिमा हे आजच्या पाकिस्तानचे अंधःकारमय वास्तव आहे.

देशातील या गंभीर परिस्थितीवर

बोलायचे सोडून इम्रान खान यांनी या मुलाखतीत कश्मीरचा राग आळवला. इम्रानच काय, पाकिस्तानच्या आजपर्यंतच्या तमाम सरकारांनी, तेथील लष्करशहांनी आपल्या देशातील मूलभूत प्रश्नांविषयी तेथील जनतेला कायम असेच अंधारात ठेवले. जेव्हा जेव्हा पाकिस्तानातील राज्यकर्ते कुठल्या ना कुठल्या कारणांनी अडचणीत सापडले, त्या त्या वेळी कश्मीरचा मुद्दा उकरून काढायचा आणि मूळ प्रश्न भरकटून टाकायचे, हा पाकिस्तानी शासकांचा रिवाजच राहिला आहे. आताही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्यांच्याविरुद्ध खदखदत असलेल्या देशांतर्गत असंतोषामुळे चक्रव्यूहात सापडले आहेत. प्रचंड महागाई, जर्जर झालेली अर्थव्यवस्था यामुळे पाकिस्तानची गोरगरीब जनता नरकयातना भोगत आहे. देश चालविण्यासाठी आणि सरकारी कर्मचाऱयांच्या वेतनासाठीही सरकारला कसरत करावी लागत आहे. आर्थिक चणचणीमुळे अमेरिका, चीन, अरब राष्ट्रांपासून ते जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपर्यंत सगळीकडेच इम्रान खान मदतीसाठी भिकेचा कटोरा घेऊन गेले काही महिने सातत्याने याचना करीत आहेत. त्यावरून पाकिस्तानातील विरोधी पक्ष व मीडियाच नव्हे तर तेथील सर्वसामान्य जनताही इम्रान मियाँची यथेच्छ टिंगल उडवत आहे. पाकिस्तानात सर्वत्र अशी भीषण परिस्थिती असतानाही पंतप्रधान इम्रान खान यांनी हिंदुस्थानला अणुयुद्धाची अप्रत्यक्ष धमकी द्यावी, हा पोरकट आणि हास्यास्पदच प्रकार म्हणायला हवा!