संदीप कोतकर याला न्यायालयीन कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

केडगाव हत्याकांड प्रकरणात पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर बुधवारी या प्रकरणातला प्रमुख आरोपी संदीप कोतकर याला न्यायालयासमोर हजर केले असता येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस.एस.पाटील यांनी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केडगाव येथे शिवसेनेचे संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणी आत्तापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये संदीप कोतकर याचाही समावेश आहे. सध्या संदीप कोतकर नाशिक येथील न्यायालयामध्ये दुसर्‍या खटल्यांमध्ये शिक्षा भोगत आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री कोतकर याला या गुन्ह्यामध्ये वर्ग केले आहे.

गेल्या 9 दिवसांपासून पोलीस कोठडीत असताना कोतकर याने योग्य माहिती दिलेली नाही. अनेक प्रश्‍नांची उत्तरे त्याने दिली नाहीत. फोन केल्याची माहिती त्याने दिली आहे. मात्र इतर माहिती त्याने तपासात दिलेली नाही. पोलिसांना याबाबत अन्य माहिती मिळवून तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तीवाद सरकारी पक्षाचे वकील बर्वे यांनी केला. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. महेश तवले यांनी 9 दिवसांच्या पोलीस कोठडीत तपास पुढे सरकला नाही. सातत्याने नेहमीचीच कारणे दिली जात आहेत. त्यामुळे न्यायालयीन कोठडी द्यावी अस युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोतकर याला 28 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.