हा मस्तवालपणा खोक्यांतून निर्माण झाला आहे, संजय राऊतांचा माजी कृषीमंत्र्यांवर निशाणा

कांदा हे गरीबांचं खाणं आहे. त्याला भाव मिळावा हे आमंच म्हणणं आहे. पण, जर एखादी गोष्ट खायला मिळत नसेल तर खाऊ नका, असं सरकार म्हणत असेल, तर तो मस्तवालपणा आहे. हा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण झाला आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माजी कृषी मंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तर देताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. कांदा परवडत नसेल तर खाऊ नका, या माजी कृषीमंत्री दादा भुसे यांच्या वक्तव्यावर ताशेरे ओढताना राऊत म्हणाले की, सरकार म्हणत आहे की एखादी गोष्ट खायला मिळत नसेल तर खाऊ नका, मग तुम्ही सरकार कशाकरता आहात. हे दीडशहाणे मंत्री कालपर्यंत राज्याचे कृषीमंत्री होते. त्यांना या राज्याची स्थिती माहीत आहे का, यावर जनता त्यांना उत्तर देईल. कांद्यामुळे दिल्लीतलं भाजपचं सरकार गेलं होतं, महाराष्ट्रातसुद्धा तीच वेळा आहे. हा अरोगन्स नसून मस्तवालपणा आहे. आम्ही जनतेशी कसंही वागू शकतो, काहीही बोलू शकतो, काहीही सल्ले देऊ शकतो. हा एकप्रकारचा मस्तवालपणा आहे आणि तो मस्तवालपणा खोक्यातून निर्माण झाला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. एखादी गोष्ट मिळत नाही तर तुम्ही उपलब्ध करून द्या. हा काय सल्ला झाला का? असा रोखठोक सवालही त्यांनी यावेळी केला.

चांद्रयान – 3च्या श्रेयवादासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, याचं श्रेय आमच्या देशाच्या वैज्ञानिकांना दिलं पाहिजे. हे कुणी राजकीय श्रेय घेण्याचं कारण नाही. वर्षानुवर्षं या प्रकल्पावरती या देशाचे शास्त्रज्ञ, संशोधक, वैज्ञानिक काम करताहेत. गेल्या 25-30 वर्षांपासून करताहेत. त्यामुळे त्याचं संपूर्ण श्रेय हे या देशातल्या वैज्ञानिकांनाच द्यावं लागेल. कोणत्याही राजकीय नेत्याने, पक्षाने, पंतप्रधानांनी, संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी घेऊ नये.

निवडणुकांसंदर्भातील प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, कुणी कितीही पक्ष फोडले, फाटाफूट केली. फोडा, झोडा, राज्य करा ही नीती अवलंबली तरी महाराष्ट्रामध्ये शिवसेना – उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार, काँग्रेस – राहुल गांधी हे प्रमुख चेहरे आहेत . तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही निवडणुक घ्या असं आमचं धोरण आहे. तुम्ही विद्यापीठाच्या निवडणुका घ्यायला घाबरताय, महापालिकेच्या निवडणुका घ्यायला तुमच्यात दम नाही. तुम्ही विधानसभा-लोकसभेला आमचा काय सामना करणार? असे राऊत यांनी म्हटले. 2024च्या केंद्रातल्या सरकारमध्ये शिवसेना म्हणून आम्हाला अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळेल, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.