
सामना प्रतिनिधी । उरण
जेएनपीटीचे नवीन अध्यक्ष म्हणून संजय सेठी यांनी पदभार स्वीकारला. सेठी हे १९९२ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी असून या अगोदर ते मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रोजेक्ट) म्हणून कार्यरत होते.
महाराष्ट्र सरकार व भारतीय सरकारमध्ये वरिष्ठ पदावरील कामाचा सेठी यांना २६ वर्षाचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त, औद्योगिक विभाग, महाराष्ट्र राज्याचे सचिव व विकास आयुक्त, ठाणे व नागपूर महानगरपालिका आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी मुंबई मेट्रो, कोस्टल रोड,अर्बन प्रोजेक्ट ऑफ वॉटर सप्लाय आणि सेव्हरेज सारख्या मोठ्या प्रकल्पाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. तसेच औद्योगिक पायाभूत सुविधा प्रकल्प साठी गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे व त्याच्या अंमलबजावणीच्या कामाचे नेतृत्व त्यांनी केले आहे.
आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना संजय सेठी म्हणाले कि, ‘जेएनपीटीचा मागील ३० वर्षापासूनचा प्रवास गतिशील राहिला असून जेएनपीटी देशातील प्रथम क्रमांकाचे पोर्ट म्हणून उदयास आले आहे. जेएनपीटी जगातील सर्वोत्कृष्ट पोर्ट म्हणून मानदंड प्राप्त करण्यासाठी विविध तांत्रिक उपाययोजना तसेच मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्प राबवित आहे. जेएनपीटीच्या प्रगतीचा आणि विकासाचा हा महत्वपूर्ण टप्पा असून या यशस्वी प्रवासाचा मी एक भाग असणार आहे याचा मला आनंद होत आहे.’

































































