फिरस्ती – गोमंतकचे सप्तकोटेश्वर मंदिर

>>प्रांजल वाघ

इतिहासकार शिवभूषण निनादराव बेडेकर यांच्या यूटय़ूबवरील व्याख्यानात छत्रपती शिवराय आणि त्यांनी जीर्णोद्धार केलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराबद्दल ऐकले आणि तेव्हापासून या मंदिराच्या भेटीची ओढ लागली.

गोवा म्हटले की, आपल्या डोळय़ांसमोर येतात ते अथांग समुद्राच्या फेसाळत्या लाटांनी बहरलेले सागरी किनारे, त्या किनाऱ्यावर असणारे शॅक्स आणि तिथे मांस, मासळी आणि मद्याचा आस्वाद घेत असलेली पर्यटक जनता. पण माझ्यासाठी गोव्याच्या आठवणी अगदी लहानपणापासून वेगळय़ा आहेत. माझ्या आजीचे ते माहेर असल्यामुळे मे महिना आला की, आम्ही गोव्याला पळायचो आणि मामाच्या गावी आम्ही नुसता दंगा करायचो. त्या अजाणत्या वयात या गोमंतक भूमीचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाते ठाऊक नव्हते. मराठय़ांचे तेरेखोल, फोंडा हे किल्ले पाहिले होते. श्री मंगेश आणि श्री शांतादुर्गा तर आमची कुलदैवते, पण पोर्तुगीजांनी पाडल्यामुळे ती फोंडय़ात पुन्हा बांधली गेली हे अगदी अलीकडे समजले. केळशी (केलोसिम) येथील पाडलेले शांतादुर्गा मंदिर कवळय़ाला एका झोपडीवजा मंदिरात स्थलांतरित झाले होते. कालांतराने तिथे छोटेखानी मंदिर बांधले गेले. पण शिवरायांचे नातू शंभुपुत्र छत्रपती शाहूंच्या पदरी नारोरम रेगे शेणवी नावाचे मंत्री होते. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यास आजचे भव्य स्वरूप दिले असावे. या गोष्टी अगदी अलीकडच्या काळात समजल्या. सुरुवात झाली ती इतिहासकार शिवभूषण निनादराव बेडेकर यांचे यूटय़ूबवरील एक भाषण ऐकताना. त्यात छत्रपती शिवराय आणि त्यांनी जीर्णोद्धार केलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिर याबद्दल ऐकले आणि मग ठरवले की या गोवा भेटीत हे मंदिर पाहायचेच.

प्राचीन गोव्याचे तीन मुख्य प्रांत होते. बारदेश, तिसवाडी आणि साष्टी (Salcette) आणि या तीन प्रांतांना विभागणाऱ्या तीन नद्या – मान्डोवी, झुआरी आणि साल. यापैकी तिसवाडीच्या उत्तरेस ‘दिवाड’ नावाचे एक छोटेखानी बेट आहे. आपली गोष्ट इथे सुरू होते. 11-12 व्या शतकात गोव्यावर कदंब राजांची सत्ता होती. श्री सप्तकोटेश्वर म्हणजे महादेव शंकर हे कदंब राजांचे कुलदैवत. मग त्याचे भव्यदिव्य मंदिर दिवाड बेटावर कदंबांनी बांधले. या मंदिराची पुष्करणी जिला ‘कोटी तीर्थ’ म्हणत ते गोव्यातील लालभडक चिरा खडक खोदून बनवले आहे. या कोटी तीर्थाच्या दगडी भिंतींवर असंख्य देवकोष्ठ कोरलेले आहेत. असे म्हणतात की, प्रत्येक देवकोष्ठात एक एक देवाची मूर्ती होती. कालांतराने बहामनी सुलतानांनी गोव्यातील कदंबांना परास्त केले आणि गोवा आपल्या अमलाखाली आणला. दिवाड बेटावरील हे मंदिर बहामन्यांनी उद्ध्वस्त केले. सन 1399 मध्ये विजयनगरचे ‘माधव मंत्री’ यांनी इथे सप्तकोटेश्वराचे मंदिर पुन्हा बांधून काढले.

गोव्यावर पोर्तुगीजांची काळी सावली पडली आणि इथले सगळे वातावरण बदलून गेले. व्यापार करायला आलेल्या या फिरंग्यांनी हळूहळू तिसवाडी बेट ताब्यात घेतले आणि तेथील हिंदू जनतेचा अनन्वित छळ सुरू केला. त्यांची मंदिरे पाडली आणि जुलूम, जबरदस्तीने धर्मांतरण सुरू केले. या मंदिरात दिवाड बेटावरील सप्तकोटेश्वर मंदिराचादेखील समावेश होता. 1540 मध्ये हे मंदिर पाडून तेथे जवळच एक चॅपेल उभारले गेले आणि देवळाच्या गाभाऱ्यातील शिवलिंग एका विहिरीवर पाणी काढण्यासाठी वजन म्हणून लावले गेले. पुढे तब्बल 18 वर्षांनी 1558 मध्ये एका काळोख्या रात्री तिथल्या महाजनांनी (पुजाऱ्यांनी) ते शिवलिंग हलवले. मान्डोवी नदी ओलांडून बिचोलीजवळ असलेल्या नार्वे गावात ते आले. तिथे एका खोपटात ते शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा सुरू झाली. सन 1668 मध्ये पोर्तुगीजांचे छळ रोखण्यासाठी दस्तुरखुद्द शिवरायांनी बारदेशवर स्वारी केली. तेव्हा नार्वे गावात एका छोटय़ा खोपटय़ात असलेल्या या सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून येथे भव्य मंदिर बांधावे असा हुकूम महाराजांनी काढला. आज आपल्याला जे मंदिर दिसते ते छत्रपतींनी बांधलेले आहे.

नार्वे बेटावरील हे भव्य मंदिर खास गोव्याच्या शैलीत बांधले आहे. मंदिराला छोटे मुखमंडप आहे आणि तिथून आत गेल्यावरच सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर शिलालेख कोरलेला आहे. खुद्द छत्रपती शिवरायांचे नाव कोरलेल्या मोजक्या ठिकाणांपैकी एक असे हे मंदिर आहे. गोवा सरकारने उत्तम कामगिरी बजावत संपूर्ण मंदिरात ‘कावी’ कलाकुसार केली आहे. गर्भगृहात सप्तकोटेश्वराचे प्राचीन शिवलिंग विराजमान आहे आणि त्यासमोर निष्ठावंत नंदी. मंदिरात विठ्ठल, श्रीकृष्ण, गणपती यांच्या प्राचीन दगडी मूर्तीदेखील आहेत. मंदिरासमोर नागबंधांनी सजलेला उंच दीपस्तंभ आहे आणि त्यापुढेच मंदिराची पुष्करणी अथवा ‘तळी.’

गोव्यातील या दोन सप्तकोटेश्वर मंदिरांची कथा मनात वेगवेगळे भावतरंग निर्माण करून जाते. दिवाड बेटावरील दुर्लक्षित ‘कोटी तीर्थ’ मनाला चटका लावून जाते. पोर्तुगीजांनी मांडलेला अमानुष छळ आठवून तिथले पाणी अजूनही थरारत असेल. गोव्यातील जनतेचा आक्रोश तिथले दगड उर फुटेस्तोवर सांगतात, तर नार्वे गावातील मोठय़ा दिमाखात उभे असलेले सप्तकोटेश्वर साक्ष देते म्लेंछक्षयदीक्षित शिवछत्रपतींच्या विजयाची आणि प्रेरणा देते कधीही हिंमत न हारण्याची.

>> [email protected]