
शिरवळ येथून कारला लिफ्ट मागून साताऱयात उतरल्यानंतर कारमधील लॅपटॉप चोरणाऱया चोरटय़ाला शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने अवघ्या दोन तासांत अटक केली. दरम्यान, चोरीला गेलेला लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला आहे. शिवराज पेट्रोल पंप, सातारा परिसरात ही घटना घडली आहे.
ओमकार मनोज जंगम (वय 23, रा. जायगाव, ता. कोरेगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील सदाशिव गुरव (वय 47, रा. निगडी, पुणे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार सुनील गुरव हे कारमधून पुणे ते कोल्हापूरकडे निघाले होते. शिरवळ येथे आल्यानंतर संशयित ओमकार याने लिफ्ट मागून कार थांबवली. सातारा येथे संशयिताने जाणार असल्याचे सांगितल्यानंतर तो कारमध्ये पाठीमागे बसला. साताऱयात शिवराज पेट्रोल पंप येथे थांबण्यास सांगितले. यावेळी कारमधून उतरताना संशयित गडबडीत उतरला व निघून गेला. यावेळी तक्रारदार यांनी कारमध्ये पाठीमागे ठेवलेला लॅपटॉप पाहिला असता तो नसल्याने लक्षात आले. तक्रारदाराने कारमधून संशयिताचा पाठलाग केला. मात्र, संशयित पसार झाला. या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने संशयिताचे वर्णन घेऊन व तांत्रिक तपास करून अवघ्या दोन तासांत गुह्याची उकल केली. संशयिताकडून चोरीचा लॅपटॉपही जप्त केला.
पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, सुजीत भोसले, पंकज ढाणे, अभय साबळे, गणेश भोंग, सागर गायकवाड, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.



























































