‘आरे वाचवा’ आंदोलनाला आता लखनौमधूनही पाठिंबा; आंदोलनाची व्याप्ती, तीव्रता वाढतेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मेट्रो-3’साठी (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) गोरेगावमधील आरेच्या जंगलात उभारण्यात येणाऱया कारशेडला पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असतानाच आता लखनौमध्येही पर्यावरणप्रेमींनी रस्त्यावर उतरून ‘आरे वाचवा’साठी पुढाकार घेतला आहे. ‘आरे वाचवा’ आंदोलनाची व्याप्ती आणि तीव्रता वाढत असून आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आहे.    

मुंबईत ‘आरे वाचवा’ आंदोलन तीव्र करण्यात आले असून दर रविवारी आरेमध्ये सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यात पर्यावरणप्रेमी, संस्था, पर्यावरणतज्ञ, विविध राजकीय पक्ष यांच्यासह स्थानिक आदिवासीही सहभागी झाले आहेत. या आंदोलनाची व्याप्ती आणि तीव्रता वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, लखनौ येथील ‘फ्रायडेज फॉर फ्युचर लखनौ’ या संस्थेने ‘आरे वाचवा’ आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या संस्थेने एक जनजागृती फेरी काढून लखनौ येथे ‘आरे वाचवा’चा नारा दिला. आरे जंगल हे मुंबईचे फुप्फुस आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे देशभरात ‘आरे वाचवा’ आंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, ही जनजागृती मोहीम राबवण्यात आल्याचे ‘फ्रायडेज फॉर फ्युचर लखनौ’च्या प्रतिनिधींनी सांगितले.