सेतू केंद्रांबाबत तीन महिन्यांत 614 तक्रारी, प्रशासनाचा कारवाईचा बडगा, 517 तक्रारी निकाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मिलिंद देखणे

नागरिकांना विविध शासकीय सेवा जलद आणि पारदर्शकपणे मिळाव्यात यासाठी सुरू करण्यात आलेल्या सेतू केंद्रांच्या कामकाजासंदर्भात प्राप्त तक्रारींवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अभिप्राय कक्षांतर्गत माहे जुलैपासून प्राप्त तक्रारींच्या कार्यवाहीचा गोषवारा समोर आला आहे. जिल्ह्यातील विविध कार्यालयांशी संबंधित एकूण 614 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत त्यापैकी 517 तक्रारींचा निपटारा केला असून, 97 तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत.

या कारवाईमध्ये केवळ समज देऊन प्रकरणे निकाली काढण्याबरोबरच दोषी आढळलेल्या सेतू केंद्रांवर तात्पुरते तसेच कायमस्वरूपी बंदची कारवाई करण्यात आली आहे. अहवालातील नोंदीनुसार, निलंबनाच्या कारवाईमध्ये सेतू केंद्रांचाही समावेश असून, विविध ठिकाणी संबंधित सेतू केंद्रांना बंद करण्याची कारवाई झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सेतू केंद्रांमधून नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे व विविध शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जात असताना त्यांच्या कामकाजाबाबत तक्रारी प्राप्त होणे आणि त्यानंतर प्रशासनाकडून बंदची कारवाई होणे ही बाब गंभीर मानली जात आहे. अहिल्यानगर कार्यालयाकडे 72 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 46 तक्रारी समज देऊन निकाली काढण्यात आल्या, तर 9 तक्रारींमध्ये तात्पुरते आणि 14 तक्रारींमध्ये कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करण्यात आली. एकूण 69 तक्रारी निकाली निघाल्या असून, तीन तक्रारी प्रलंबित आहेत. अहवालात निलंबनाच्या कारवाईतील तक्रारींमध्ये सेतू केंद्रांचाही समावेश आहे.

श्रीगोंदा-पारनेरमध्ये 44 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी 40 तक्रारी समज देऊन निकाली काढण्यात आल्या. दोन तक्रारींमध्ये सेतू केंद्रांवर कायमस्वरूपी बंदची कारवाई झाली असून, दोन तक्रारी प्रलंबित आहेत. पाथर्डीमध्ये 127 तक्रारी प्राप्त झाल्याने हा आकडा सर्वाधिक आहे. त्यापैकी 99 तक्रारी समज देऊन निकाली काढण्यात आल्या. सात तक्रारींवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई झाली. एकूण 106 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून 21 तक्रारी प्रलंबित आहेत. या ठिकाणी तीन सेतू केंद्रे तात्पुरती बंद करण्यात आल्याची नोंद आहे. कर्जत येथील 56 तक्रारींपैकी 48 तक्रारी समज देऊन निकाली काढण्यात आल्या असून, आठ तक्रारी प्रलंबित आहेत.

श्रीरामपूरमध्ये 116 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 32 तक्रारी समज देऊन निकाली काढण्यात आल्या, तर 19 तक्रारींमध्ये तात्पुरते आणि 19 तक्रारींमध्ये कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई झाली. एकूण 70 तक्रारी निकाली निघाल्या असून, तब्बल 46 तक्रारी प्रलंबित आहेत. अहवालानुसार निलंबनाच्या कारवाईतील तक्रारींमध्ये सेतू केंद्रांचाही समावेश असून, काही सेतू कायमस्वरूपी तर काही तात्पुरते बंद करण्यात आली आहेत.

शिर्डीमध्ये 118 तक्रारी प्राप्त झाल्या. यातील तब्बल 102 तक्रारी समज देऊन निकाली काढण्यात आल्या असून, 16 तक्रारी प्रलंबित आहेत. या ठिकाणी निलंबनाची कारवाई नोंदविण्यात आलेली नाही. संगमनेरमध्ये 81 तक्रारींपैकी 78 तक्रारी समज देऊन निकाली काढण्यात आल्या. दोन तक्रारींमध्ये तात्पुरत्या निलंबनाची कारवाई झाली असून, 80 तक्रारी निकाली निघाल्या आहेत.

445 तक्रारींमध्ये समज; 72 प्रकरणांत निलंबन

– जिल्ह्याच्या एकत्रित आकडेवारीनुसार, 614 तक्रारींपैकी 445 तक्रारी समज देऊन निकाली काढण्यात आल्या. 37 तक्रारींमध्ये तात्पुरते निलंबन, तर 35 तक्रारींमध्ये कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यामुळे निलंबनाच्या दोन्ही प्रकारांत मिळून 72 तक्रारींचा समावेश आहे. एकूण 517 तक्रारींचा निपटारा झाला असून, 97 तक्रारी प्रलंबित आहेत.