शिवसेनेच्या ‘रॅप साँग’चा जबरदस्त दणका, बोलाची कढी… कशाला करतो गॅरंटीची बात!

लोकसभा निवडणुकीमुळे राज्यासह देशातील वातावरण तापले आहे. लोकसभेच्या दुसऱया टप्प्याचे मतदान पार पडले आहे. आता 7 मे रोजी मतदानाचा तिसरा टप्पा आहे. राज्यभरात महाविकास आघाडीने प्रचारात जोर धरला आहे. अशातच शिवसेनेने रविवारी आपले रॅप साँग प्रचार गीत लाँच केले. ‘काय चाललंय? अरे चाललंय तरी काय?’ असे विचारत मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कामगिरीची पोलखोल रॅप साँगमधून करण्यात आलीय. सोशल मीडियावर या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय.

शिवसेनेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवर रॅप साँगचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. व्हिडीओमधून सामान्य माणसाच्या प्रश्नांवरून पळ काढणाऱया सरकारवर भाष्य करण्यात आले आहे. ‘चोरी चपाटी, लांडीलबाडी, बनवाबनवी, फेकाफेकी, जुमल्याची गोळी…बोलाची कढी अन् बोलाचा भात, कशाला करताय गॅरंटीची बात…काय चाललंय? अरे चाललंय तरी काय?’ असा थेट सवाल करण्यात आलाय.

ज्वलंत प्रश्नांवर भाष्य

रॅप साँगमधून अनेक ज्वलंत मुद्दय़ांवर बोट ठेवले आहे. पक्षपह्डी, गद्दारांना क्लीन चिट, लोकशाहीची हत्या, देशातील वाढती बेरोजगारी, जमिनी, बंदरे-विमानतळ विकणे, राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पळवणे अशा अनेक मुद्दय़ांवरून मोदी सरकारला घेरले आहे.

– साध्या व सोप्या शब्दांत हृदयाला भिडेल असे वास्तव या गाण्यातून मांडले आहे. काही तासांतच रॅप साँग तुफान सुपरहिट झाले आहे. सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, प्रचार सभांमधून ते आता जनसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे.

एकच दे पण सॉलिड दे

‘50 खोके एकदम ओके…ओके? अरे नॉट ओके…’ असे व्हिडीओमध्ये ठणकावण्यात आलंय. तसेच हुकूमशाही फेकून हाती मशाल घेण्याचे आवाहन करण्यात आलंय. ‘सावित्रीची लेक तू…सह्याद्रीचा छावा तू… शक्ती तुझी विशाल…हाती तुझ्या मशाल… एकच दे पण सॉलिड दे, ही हुकूमशाही फेकून दे… दे फेकून… काय चाललंय, अरे चाललंय तरी काय? आता घ्या हाती मशाल!’ अशा शब्दांत लोकशाही वाचवण्याचे आवाहन करण्यात आलेय.