संजय राऊत यांचा बुलडोझर, बाप–बेटे तुरुंगात जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किरीट सोमय्यांनी मुंबईतील बिल्डर, व्यापारी यांना ईडीची धमकी देऊन त्यांच्याकडून शेकडो कोटी उकळले. 8 जेव्हीपीडी स्कीम येथील 100 कोटींहून अधिक किंमतीचा प्लॉट किरीट सोमय्या आणि अमित देसाई यांनी ईडीची धमकी देऊन मातीमोल भावाने खरेदी केला. क्रिमिनल सिंडिकेट, ईडीच्या नावाने धमक्या या सगळय़ाचा आता भंडाफोड होईल. किरीट आणि नील सोमय्या हे बाप-बेटे तुरुंगात जाणार, 100 टक्के जाणार, असा इशाराच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज दिला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर निशाणा साधला. दुसऱयांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देता, आता तुम्ही तुरुंगात जा. मी सांगतोय, कारण मी जबाबदार माणूस आहे. भाजपने सांगावे की, सोमय्या जबाबदार माणूस आहे म्हणून.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार

यावेळी 19 बंगल्यांचा उल्लेख पत्रकारांनी केला असता संजय राऊत म्हणाले, छोडो यार! कोण किरीट सोमय्या, कसले पुरावे? सोमय्या हे काय इन्व्हेस्टिगेशन ऑथॉरिटी नाही. मी सांगतोय, कारण मी जबाबदार माणूस आहे. भाजपने सांगावे की, सोमय्या जबाबदार माणूस आहे म्हणून. तिथे बंगले आहेत की नाहीत हे सांगावे, कागदबिगद आहेत वगैरे सांगू नका. 19 बंगले कुठे आहेत, देवस्थानाच्या जमिनी कुठे आहेत, संजय राऊत यांची बेनामी संपत्ती कुठे आहे? अर्जुन खोतकर भावना गवळी, आनंद अडसूळ यांना त्रास का दिला जातोय हे माझे प्रश्न आहेत. एक दूधवाला महाराष्ट्रात येतो. सरकारमधील लोकांचे पैसे गुंतवतो आणि सात हजार कोटींचा मालक बनतो? उत्तर द्या. अमोल काळे कोण आहे हे स्पष्ट करा, असे आव्हान देताना सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करणार, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

…तर 15 कोटी ज्या अधिकाऱयाला दिले त्याचे नाव जाहीर करीन

8 जेव्हीपीडी स्कीम सुजित नवाब नावाचा प्लॉट किरीट सोमय्या आणि त्यांचा बिल्डर मित्र अमित देसाई यांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन हा 100 कोटी रुपयांचा प्लॉट मातीमोल भावाने खरेदी केला. हा प्लॉट किरीट सोमय्यांचे मित्र अमित देसाईंच्या नावावर करून घेतला. त्यातले 15 कोटी रुपये किरीट सोमय्यांनी कोणत्या अधिकाऱयाला दिले हे ईडीच्या अधिकाऱयांनी स्पष्ट करावे. नाहीतर त्या अधिकाऱयाचे नाव मी घेईन, असा घणाघात संजय राऊत यांनी यावेळी केला.

बिल्डर, व्यापाऱयांकडून शेकडो कोटी उकळले

मी आव्हान दिले होते की, ते 19 बंगले दाखवा; पण ते यांनी दाखवलेत का, असा सवाल संजय राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले, अर्जुन खोतकर यांना कसा आणि किती त्रास दिला हे मला माहीत आहे. या किरीट सोमय्यांनी मुंबईतील बिल्डर, व्यापारी यांना ईडीची धमकी देऊन त्यांच्याकडून शेकडो कोटी उकळलेत. त्यातले किती टक्के ईडीकडे गेले हे ते खासगीत सांगत असतात, असा स्पष्ट आरोप संजय राऊत यांनी केला.