अतृप्त आत्मा पंतप्रधानपदी पुन्हा बसला तर देशाची भुताटकी आणि स्मशान होईल; संजय राऊत यांचा मोदींवर निशाणा

महाराष्ट्राचे मराठी माणसाचे शत्रू ज्यांना महाराष्ट्राने या मातीत गाडले आहे, अशा औरंगजेब, अफजल खान यांचे आत्मे गेल्या 400 वर्षांपासून भटकत आहेत. त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा भटकत आहे. असे अनेक आत्मे महाराष्ट्रात फिरत असले, ते काहीही वक्तव्य करत असले, तरी अशा भुताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही. अंधश्रद्धा, ढोंग, फेकाफेकी यांना महाराष्ट्राने कधीही महत्त्व दिलेले नाही. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, अशा पवित्र आत्म्यांचा हा प्रदेश आहे. इथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा सुपुत्र जन्माला आला, असेही संजय राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी काल पुण्यात होते.या वेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेखही केला नाही. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत राग आहे, त्यांना बाबासाहेबांनी दिलेले देशाचे संविधान बदलायचे आहे. त्यासाठी हे आत्मे महाराष्ट्रात भटकत आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना ठामपणे उभी आहे. त्यामुळे असे भटकते आत्मे काय वक्तव्य करतात, याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात येऊन ते भटकती आत्मा असा उल्लेख करतात. उद्या महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्रासाठी बलिदान केलेल्या 105 हुतात्म्यांचे आत्मे मोदी यांना शाप देणार आहेत. मोदी आणि भाजपने जेवढे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे नुकसान केले, तेवढे कोणीही केले नसेल. त्यामुळे या अतृप्त आत्म्यांविरोधात महाराष्ट्राची लढाई आहे. उद्या महाराष्ट्र दिन असल्याने 105 हुतात्म्यांच्या पवित्र आत्म्यांना आम्ही आदरांजली वाहणार आहोत. राज्यात महाराष्ट्रविरोधी अतृप्त आत्मे फिरत आहेत. आम्ही त्यांचा बदला घेऊ, असे आम्ही त्यांना सांगणार आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचे अनेक उमेदवार आहेत, असे मोदी म्हणत आहेत. ते चांगले आहे. त्यांच्यासारखा एकच अतृप्त आत्मा पंतप्रधानपदी बसला तर देशाची भुताटकी आणि स्मशान होऊन जाईल. आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी एकापेक्षा जास्त चेहरे आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले आणि उत्तम उदाहरण आहे. लोक स्वीकारतील तो पंतप्रधान बनेल, भाजपसारखा आम्ही पंतप्रधान देशावर लादणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नसीम खान यांच्या उमेदवारीला आमचा कधीही विरोध नव्हता आणि नाही. जात आणि धर्म पाहून शिवसेना कधीही उमेदवारी देत नाही किंवा विरोध करत नाही, तसेच करणारही नाही. उमेदवारी ठरवताना मित्र पक्षांशी चर्चा केली. एकत्र काम करायचे असल्याने अशी चर्चा करण्यात येते. नसीम खान हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते तोलामोलाचे उमेदवार आहेत. मात्र, कोणाला उमेदवारी द्यायची, हा त्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांनी नसीम खान यांना उमेदवारी दिली असती, तर शिवसेना त्यांच्या पाठिशी उभई राहिली असती. आताही त्यांना वाटत असेल तर ते उमेदवार बदलू शकतात. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. काँग्रेसचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. आमच्या मित्रपक्षांचा जो कोणी उमेदवार असेल, तो महाविकास आघाडीचा असेल, त्याला विजयी करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत, असेही संजय राऊत म्हणाले.