युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे काय ते बोला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav thackeray

महेश कुलकर्णी । बीड/जालना

‘दुष्काळाचे संकट महाभयंकर आहे. अख्ख्या महाराष्ट्रातील शेतकरी आक्रोश करतोय. शेतकरी आधारासाठी तडफडतोय. परिस्थिती गंभीर असताना आम्ही काय युतीची चर्चा करत बसणार? शिवसेना असे दळभद्री राजकारण करत नाही. युतीची चर्चा पेपरातच सुरू आहे, आमच्याकडे नाही! युतीची चर्चा गेली खड्डय़ात, आधी शेतकऱयांचे काय ते बोला!’ अशा शब्दांत आज उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला! शेतकऱयांना मदत करण्याऐवजी सरकार सुस्त अजगरासारखे पडले आहे. परंतु शिवसेना मात्र शेतकऱयांना वाऱयावर सोडणार नाही. दुष्काळ गंभीर असला तरी शिवसेना शेतकऱयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिवसेनेच्या वतीने बीड व जालना जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त शेतकऱयांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी घोषणाबाजीचा पाऊस पाडणाऱया भाजप सरकारची अक्षरशः सालटी काढली. नवे वर्ष संपले की आपण येणाऱया नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो. सरलेले वर्ष इतिहासजमा झाले, पण येणारा काळ तरी चांगला जाऊ दे, अशी अपेक्षा यामागे असते. पण नुसते अच्छे दिन येणार म्हणून चालत नाही. ते आणण्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागेल. थापा मारणारे थापाडे आता तरी ओळखा. थापाडे ओळखलेत की अच्छे दिनच नाही, तर अच्छे वर्ष येतील, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेवर मदतीचा संस्कार

काही वर्षांपूर्वी लातूरला प्रलयकारी भूकंप आला होता. शिवसेनाप्रमुखांनी स्वतः भूकंपग्रस्त भागाला भेट  देऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. एवढेच नाही तर शिवसेनेने लिंबाळा दाऊ या गावाचे पुनर्वसन केले. शिवसेनाप्रमुखांनी संकटात असलेल्यांची मदत करण्याचा संस्कार आमच्यावर केला आहे, असे सांगून उद्धव ठाकरे  म्हणाले, हाच वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. दिवाळीत शिवसेनेच्या वतीने पाच हजार शेतकऱयांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली होती. आताही पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी 100 ट्रक पशुखाद्य देणार असल्याचे सांगितले. एवढय़ावर भागणार नाही, मी रामदास कदम यांना सांगितलेय, पशुखाद्य कमी पडता कामा नये. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, अशी स्पष्ट सूचनाही त्यांनी यावेळी केली.

कोरडय़ा भाषणाने हंडा भरत नाही

सरकारच्या घोषणाबाजीवर उद्धव ठाकरे यांनी यावेळी कडाडून हल्ला चढवला. कोरडी भाषणे आणि घोषणांचा पाऊस याने हंडा भरत नाही. मी स्वस्तात घर देतो असे म्हटल्याने स्वस्तात घर मिळते का? धरणे बांधून देतो, तलाव बांधतो असे म्हणून काम होत नाही. मी म्हणतो, उद्याचे जाऊ द्या, आता माझा हंडा कोरडा आहे त्यात पाणी कसे आणि कोठून टाकणार हे बोला! शेतकरी संकटात आहे. जनावरांचे चारापाण्यावाचून हाल होत आहेत आणि सरकारचे अजून चारा छावणीला की दावणीला असा पिंगा सुरू आहे. भयावह दुष्काळ समोर दिसत आहे. शेतशिवारात वणवा पेटला आहे आणि यांना दुष्काळ दिसायला यंत्रणा राबवावी लागते. माझ्याकडे कोणतीही यंत्रणा नाही. दुष्काळ बघणारे तुमचे डोळे हीच माझी यंत्रणा. मला शेतीतले कळत नाही. पण मला शेतकऱयाच्या डोळय़ातले अश्रू दिसतात. आता शेजारच्या सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेत. केंद्राचे पथक पाहणी करून गेले. त्यालाही आता महिना उलटला. शेतकऱयाच्या हातात काय पडले? मिळाली का तुम्हाला मदत? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारताच उपस्थित जनसमुदायाने ‘नाही! नाही!’ असा घोष केला. हे केंद्राचे पथक होते का लेझिम पथक? का बेंजो पथक होते? काय केले या पथकाने ? असा थेट सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

गाजर वाटण्याचीही यांची ऐपत नाही

राज्यात भयंकर दुष्काळ आहे. अन्नदाता शेतकऱयाचे हाल बघवत नाहीत. जनावरे खाटकाच्या दावणीला जात आहेत. परिस्थिती वाईट आहे, पण सरकार नुसते घोषणांची गाजरे दाखवत आहे. गाजरे वाटत नाही, कारण त्यासाठीही ऐपत असावी लागते, असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. अण्णासाहेब पाटील महामंडळाकडे कर्जासाठी 29000 अर्ज आले आहेत. अनेकांचे स्वप्न भंगणार आहे, हे दाहक वास्तव सांगणारी एक बातमीच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दाखवली.

देश बदल रहा है… पण तुमच्यासाठी

‘देश बदल रहा है’ हे म्हणणे तुमच्यासाठी ठिक आहे. तुम्ही नवनव्या देशात जाता त्यामुळे देश बदलत असल्याचे तुम्हाला वाटते. तुमच्यासाठी देश बदलतोय, पण माझ्या देशातील शेतकरी आहे तिथेच आणि तसाच आहे. त्याचे राहणीमान, त्याचे दुःख, त्याची वेदना बदलली नाही. खोट बोलून मिळालेले एकही मत मला नको, अशी शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. खरे बोलून एकही मत मिळाले नाही तरी चालेल. हीच परंपरा घेऊन मी पुढे जात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

पीकविमा घोटाळा राफेलपेक्षाही मोठा

ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ या पुस्तकात पीकविमा घोटाळय़ाचा भंडाफोड केला आहे. राफेलपेक्षाही पीकविमा घोटाळा मोठा असल्याचे साईनाथ म्हणतात. शेतकरी दहा हजाराचा हप्ता भरतो आणि त्याला भरपाई मिळते पाच रुपयाची! प्रधानमंत्री फसल योजना, म्हणजे फसाल योजना आहे असे साईनाथ यांचे म्हणणे आहे. उद्धव ठाकरे यांनी पीक विम्याचा विषय काढताच रणजीत आखाडे या शिवसैनिकाने बाजरीला विमा आहे पण कापसाला विमा नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर पंपाला कीज नाही, गुरांना चारा नाही, शेतीला आणि प्यायला पाणी नाही, महिलांना सुरक्षा नाही, उज्ज्कला योजनेतील अनुदानित सिलिंडरचाही पत्ता नाही, पीककिमा योजनेचे हप्ते भरले तरी नुकसानभरपाई नाही मिळत मग हे सरकार करायचंय काय? असा मर्मभेदी सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

तुमचे दिवस राहिलेत किती?

दुष्काळाने शेतकरी देशोधडीला लावला आहे. त्याला आधार देण्याऐवजी सरकार अजगरासारखे सुस्त पडले आहे. याच अजगराला ढुसण्या देण्याचे काम मी करतो आहे. दुष्काळी वातावरणात युतीची चर्चा सुरू आहे.. पण ती फक्त पेपरात. आमच्याकडे नाही. पंढरपूरच्या सभेत मी चिडून बोललो होतो, युतीची चर्चा गेली खड्डय़ात, आधी शेतकऱयांचे काय करता ते बोला! आजही मी तेच म्हणतो आहे. नुसत्या चर्चा करून चालत नाही. महाराष्ट्राला किती मदत पाहिजे? 10 हजार कोटी. दिले. पण ते मिळणार कधी? अरे तुमचे दिवस राहिलेत किती? पुन्हा येणार की नाही हे माहिती नाही, अन् नुसत्या फुसक्या घोषणा करून काय होणार? घोषणांनी शेतकऱयाचे पीक पुन्हा तरारून उभे राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱयांच्या हाताला काम, गुरांना चारा आणि प्यायला पाणी दिलेत तरी त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल, असा चिमटाही यावेळी त्यांनी काढला.

सोलापूर जिल्हय़ात पंतप्रधान येतात. विकासाचे नारळ फोडतात. पण दुष्काळावर मूग गिळतात. डोनाल्ड ट्रम्पबरोबर तुमचे फोटो येतील. कधीतरी या दुष्काळाने पिडलेल्या मराठवाडय़ात या. इथल्या शेतात जाऊन बघा, दुष्काळाने कसा मसणवटा केला आहे. त्या शेतकऱयाच्या जीवनात कधी बदल होणार?

दुष्काळग्रस्त शेतकऱयांना मदतीचे वाटप

दुष्काळग्रस्तांचे अश्रु पुसण्यासाठी शिवसेनेने मदतयाग उभारला आहे. आज बीड व जालना जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त शेतकऱयांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पशुखाद्य, पाण्याच्या टाक्या यांचे वाटप करण्यात आले. बीड जिल्हय़ातील म्हाळस जवळा येथे प्रातिनिधीक स्वरूपात दहा शेतकऱयांना मदतीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर बीड येथेही दहा शेतकऱयांना मदत देण्यात आली. गेवराई येथेही शेतकऱयांची मदत करण्यात आली.  जालना व बदनापूर येथेही जालना व बदनापूर येथेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतकऱयांना शेतकऱयांना जनावरांसाठी पशुखाद्य तसेच पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांना नाडणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या विरोधात रान पेटवा! : उद्धव ठाकरे

जालना येथील सभेत राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी राज्यातील कारखाने उसाला दोन ते अडीच हजार टन असा भाव देत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या साखर कारखान्यात उसाला केवळ 1600 रुपये एवढा भाव देत असल्याचे सांगितले. शेतकऱयांवरील या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी परवानगी द्या अशी विनंती त्यांनी केली. हाच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा झाली. 32 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ झाल्याचे सांगण्यात आले. पण कर्जमाफी झाली नाही असे शेतकरी सांगतात, मग कुठे गेले पैसे? शेतकरी मदतीसाठी आक्रोश करत असताना ‘रडतात साले’ अशी त्यांची टिंगलटवाळी करणाऱया रावसाहेब दानवे यांच्या विरोधात रान पेटवा, रडवा त्यांना, त्यासाठी परवानगीची कशाला वाट पाहता असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारच्या कर्जमाफीचा भंडाफोड

कर्जमाफीचे ढोल वाजवले जात आहेत. पीक विमा मिळाल्याचे बोलले जात आहे. खरेच मिळाली का कर्जमाफी, पीकविमा? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थित शेतकऱयांनी हात वर करून एकमुखाने नाही असे उत्तर दिले. हाच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले कर्जमाफी झालेला शेतकरी मी शोधतोय आणि तो मला मिळाला असे सांगत त्यांनी एका शेतकऱयाला व्यासपीठावर बोलावले. हे अंजनडोह येथील बाळासाहेब सोळुंके. त्यांना कर्जमाफी झाल्याचे सरकारी प्रमाणपत्र मिळाले आहे. पण खरेच मिळाली का कर्जमाफी, तुम्हीच बोला असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सोळुंके यांनाच बोलायला लावले. सोळुंके यांनी कर्जमाफी झाली नाही असे सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बस्स झाले, अन्नदात्याला खोटे बोलून फसवताय. याद राखा शेतकऱयांना फसवाल तर सरकारच्या विरोधात मी स्वतः आसूड घेऊन उभा राहीन असा सनसनीत इशाराच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. खोटय़ा कर्जमाफीचे आकडे दाखवून वर आम्हालाच सरकारविरोधी ठरवताय. शेतकऱयांसाठी मी सरकारविरोधी ठरलो तरी मला त्याची पर्वा नाही असेही त्यांनी बजावले.

शिवसेनेच्या वतीने बीड व जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे, प्रा. रविंद्र गायकवाड, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेत्या तथा प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, विनोद घोसाळकर, संभाजीनगरचे महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे, माजी मंत्री बदामराव पंडीत आदींची उपस्थिती होती.