शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त होणार शौर्य आणि भक्तीचा जागर, रायगडावर दोन दिवस रंगणार लोकोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352वा राज्याभिषेक दिन सोहळा तारखेनुसार शनिवार 6 जून रोजी किल्ले रायगडावर भगव्या उत्साहात पार पडणार आहे. त्यानिमित्ताने उद्या शुक्रवारपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दोन दिवस शौर्य आणि भक्तीचा जागर होणार आहे. पोवाडय़ांचा निनाद… शिवस्तुती आणि डफावरील थाप यामुळे राजधानी रायगड किल्ल्यावर शिवकाळ अवतरणार आहे.

या वर्षीदेखील अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. विविध प्रकारच्या चाळीस समित्या हा सोहळा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात उद्या शुक्रवारी 5 जून रोजी दुपारी 3.30 वाजता पाचाड येथील राजमाता जिजाऊसाहेबांच्या समाधीला अभिवादन करून होणार आहे.