शिवसेनेची मशाल घराघरात पोहोचली; अंधेरीतील प्रचारात शिवसैनिकांची जोरदार आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या प्रचारफेऱयांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेची मशाल निशाणी घराघरात पोहोचली असून या चिन्हावर शिक्का मारून ऋतुजा लटके यांना विजयी करणार अशी ग्वाही मतदारांकडून दिली जात आहे.

शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. लटके यांच्या प्रचारासाठी रविवारीही शिवसैनिक मोठय़ा संख्येने जमले होते. प्रचार फेरी ज्या ज्या ठिकाणी पोहोचत होती त्या प्रत्येक वसाहतीत औक्षण करून लटके यांचे स्वागत केले जात होते. नवपाडा येथील शंकर मंदिरापासून प्रचाराला सुरुवात झाली. या प्रचारात महिला शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय होती. शिवसैनिकांबरोबर चाळीचाळीतील महिला, पुरुष तसेच तरुण-तरुणीही मोठय़ा संख्येने या प्रचारफेऱयांत स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. या प्रचार फेरीवेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, कमलेश राय, काँग्रेसचे क्लाइव्ह डायस, शाखाप्रमुख बिपीन शिंदे आदी उपस्थित होते.