शिवतीर्थ विठ्ठल, शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे लाखो, करोडो शिवसैनिकांचे साक्षात विठ्ठलच… शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवसैनिक आज स्मृतिस्थळावर नतमस्तक झाले. शिवसेनाप्रमुखांना वंदन करून शक्तिस्थळावरची माती कपाळी लावण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱयातून आलेल्या हजारो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींची सकाळपासूनच प्रचंड रीघ लागली होती. कोरोना संकट ओसरल्यानंतर तब्बल दीड वर्षाने ‘भेटी लागी जीवा… लागलिसे आस’ या भावनेतून आपल्या लाडक्या दैवताच्या दर्शनासाठी आलेल्या शिवसैनिकांमुळे शिवतीर्थावर भक्ती आणि शक्तीचा संगमच झाला होता. अवघे शिवतीर्थ ‘तीर्थ विठ्ठल’ झाले होते…

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतिदिन. आपल्या लाडक्या साहेबांना वंदन करण्यासाठी अढळ श्रद्धेने शिवसैनिकांनी आज सकाळपासूनच शिवतीर्थावरील शक्तिस्थळावर रीघ लावली होती. शिवसेनाप्रमुखांनी दिलेले शिस्तीचे बाळकडू जपत महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून आलेले शिवसैनिक एका रांगेने कोरोना नियमांचे पालन करीत शक्तिस्थळावर लीन होत होते. लाखोंच्या गर्दीमध्ये स्फुल्लिंग चेतविणाऱया शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींनी शिवसैनिक व शिवसेनाप्रेमी गहिवरले. शिवसेनाप्रमुखांच्या आवडीची सोनचाफ्याची फुले स्मृतिस्थळावर भक्तिभावाने अर्पण केली जात होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून आलेले शिवसेनाप्रमुखांचे चाहते तसेच शिवसैनिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी स्थानिक शिवसैनिकांनी घेतली. शिवसेनेच्या कामगार सेना तसेच अन्य अंगीकृत संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी अल्पोपहार तसेच पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.

गाण्यातून शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना उजाळा

‘होता एक अंगार तो…’ या गाण्यातून शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. हे ऑडिओ गीत आनंदी विकास यूटय़ूब चॅनेलवर लाँच झाले आहे. आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताचे गीतकार संजीव कोकीळ आहेत. या गाण्याला ज्ञानेश्वर मेश्राम यांनी स्वरसाज लाभला.

मान्यवरांची आदरांजली

केंद्रीय राज्यमंत्री, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, राष्ट्रवादीचे नेते, मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार मंगल प्रभात लोढा, शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, रामदास कदम, खासदार गजानन कीर्तिकर, अॅड., लीलाधर डाके, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, विधानसभा पक्षप्रतोद सुनील प्रभू, महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, सचिन अहिर, शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, कृषी मंत्री दादा भुसे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार राहुल शेवाळे, राजन विचारे, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, आमदार दीपक केसरकर, गीता जैन, माजी आमदार सुनील शिंदे, दगडू सकपाळ, माजी माहपौर श्रद्धा जाधव, अपंग सहाय्य सेनेचे सूर्यकांत लाडे आदींनी आदरांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

शिवसेना पक्षसंघटनेच्या माध्यमातून मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवणाऱया आभाळाएवढय़ा उंचीच्या महान नेतृत्वास अभिवादन. शिवसेनाप्रमुख अद्वितीय वक्ता, साक्षेपी संपादक, सिद्धहस्त व्यंगचित्रकार, मोठय़ा मनाचा दिलदार माणूस होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.

शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेनाप्रमुखांना मानवंदना दिली.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्मृतिस्थळी अभिवादन केले.

रवी म्हात्रे यांनी स्मृतिस्थळी दर्शन घेतले.

मुस्लिम बांधवांनीही आदरांजली वाहिली.

शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी स्मृतिस्थळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 9व्या स्मृतिदिनानिमित्त आज विधान भवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आमदार नाना पटोले, अशोक पवार, अभिजीत वंजारी, अमोल मिटकरी, सरोज अहिरे, विक्रम काळे, कपिल पाटील, यामिनी जाधव, मनीषा कायंदे, निर्मला गावीत, विधान मंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव रवींद्र जगदाळे यांनीही प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

राज्यभरातून येणाऱया शिवसैनिकांसाठी अल्पोपाहार व पिण्याच्या पाण्याची सोय शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने शिवतीर्थावर करण्यात आली. शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, सचिव सूरज चव्हाण, मुख्यमंत्री कार्यालय जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान, महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर, आमदार अजय चौधरी, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबुरकर, सुनील शिंदे आदी मान्यवरांनी भेट दिली. विजय मालनकर, अशोक शेंडे, राजू पाटील, निखिल सावंत, वनिता पाटील, देविदास माद्ये, राजेश कुचिक यावेळी उपस्थित होते.

शिवसेना अंधेरी पश्चिमच्या वतीने आणि जुहूच्या लोटस आय हॉस्पिटलच्या सहकार्याने विभागातील 1 हजार नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते झाला. यावेळी युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, आयोजक विधानसभा संघटक संजय कदम, सुनील जैन खाबिया, लोटसचे ट्रस्टी नवीन शाही आदी उपस्थित होते.

बाळासाहेबांच्या वक्तृत्वाने राजकारणाला दिशा दिली

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपली भेदक लेखणी व अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली. आपल्या विचारांनी सर्वसामान्यांच्या मनात अस्मितेची आणि स्वाभिमानाची चेतना निर्माण केली. शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.