श्री रुक्मिणीमातेचे चरण झाले पूर्ववत; बारा तासांनंतर वज्रलेपाचे काम पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीवरील वज्रलेपाची प्रक्रिया आज दुपारी पूर्ण झाली. वज्रलेपानंतर रुक्मिणीमातेचे चरण पूर्ववत झाले आहेत. या रासायनिक लेपनानंतर पुढील दोन दिवस रुक्मिणीमातेचे नित्योपचार आणि पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे.

शनिवारी रात्री 11 वाजता रासायनिक लेपन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. आज दुपारी दोन वाजेपर्यंत लेपनाचे काम सुरू होते. या प्रक्रियेला जवळपास 12 तासांचा अवधी लागला. संभाजीनगर येथील भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही वज्रलेप प्रक्रिया पार पडली. रुक्मिणीमातेच्या चरणांवर ‘इफोक्सी सिलिकॉन’ लेपन करण्यात आल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

श्री रुक्मिणीमातेच्या चरणांची झालेली झीज व मंदिर  समितीचे दुर्लक्ष यामुळे भक्तांमध्ये तीक्र संताप व्यक्त होत होता. प्रसारमाध्यमांनी याविषयी आवाज उठविल्यानंतर डॉ. नीलम गोऱहे यांनी तातडीने पंढरपूर गाठून मूर्तीची पाहणी करून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

चरणांची काळजी घ्या…
‘श्री रुक्मिणीमातेची मूर्ती शाळिग्राम दगडाची आहे. या मूर्तीवर वज्रलेप दोन ते चार वर्षेच टिकतो. सध्या ‘इफोक्सी सिलिकॉन’ लेपन करण्यात आले आहे. पदस्पर्श दर्शन, मूर्तीला होणाऱया नित्योपचारांमध्ये वापरण्यात येणारे पाणी, दही, दूध, मध यांचे प्रमाण मंदिर समितीने कमी करावे. तसे झाले तर रुक्मिणीमातेच्या चरणांवर केलेला वज्रलेप जास्त दिवस राहील. मंदिर समितीच्या पुजारी व्यक्तीने रुक्मिणीमातेच्या चरणांना इजा अथवा धक्का लागू नये, याची काळजी घ्यावी.’
– श्रीकांत मिश्रा, भारतीय पुरातत्व विभाग, संभाजीनगर