श्रीगोंद्यात भाजप आमदार पाचपुते, नागवडेंचा धुव्वा; तालुका खादी ग्रामोद्योग संघावर राहुल जगताप यांचे निर्विवाद वर्चस्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राजेंद्र नागवडे यांच्या गटाचा धुव्वा उडाला. या निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्री संत शेख महंमद महाराज पॅनल’ने सर्वच्या सर्व 11 जागा जिंकून संघावर निर्विवाद वर्चस्व राखले.

रविवारी (दि. 11) पार पडलेल्या श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे माजी चेअरमन अंकुशराव शिंदे, भगवान गोरखे यांच्या नेतृत्वाखालील श्री संत शेख महंमद महाराज पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.

या निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी मीराताई सर्जेराव शिंदे, रमेश भाऊ कळमकर, रेवती मनोज घाडगे या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर सर्वसाधारण मतदारसंघातून दिलीप चंदर तोरडमल, दुर्योधन सीताराम लोखंडे, वसंत नानासाहेब सकट, बापूसाहेब देवराम गायकवाड, नानासाहेब जनार्दन ससाणे, ज्ञानदेव नारायण गोरखे, भटक्या विमुक्त जाती-जमातीमधून बबन किसन श्रीराम, अनुसूचित जाती-जमातीमधून सुनील दादा काळे हे सुमारे 414 मतांनी विजयी झाले. भटक्या विमुक्त जाती-जमातीमधून बबन किसन श्रीराम यांनी सर्वाधिक असे 714 मतदान घेत उच्चांकी मतांनी निवडून आले. या निवडणुकीत विरोधी अनेक उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली.

विजयी उमेदवारांचे माजी आमदार राहुल जगताप, डॉ. प्रनोती जगताप, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अतुल लोखंडे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले. निवडणूक प्रक्रियेत ज्येष्ठ नेते गुलाबराव तोरडमल, संतोष शेलार, मीनाक्षी सकट, संपत कुचेकर, पोपटराव तोरडे, भगवान अवचिते, लाला घाडगे, राहुल पवार, सुभाष शिंदे, वामन शिंदे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.