सोडून गेलेल्या पत्नीला बहिणीने लपविले, मामाने चिमुरड्या भाचीचे केले अपहरण

प्रातिनिधीक फोटो

गेल्या महिनाभरापासून सोडून गेलेल्या पत्नीला बहिणीनेच लपवून ठेवल्याच्या रागातून पाच वर्षांच्या भाचीचे अपहरण करणारा मामा संतोष सुरेश माळी (33) आणि त्याचा साथीदार प्रथमेश सतीश शिंगे (वय 25, दोघेही रा. नवीन वसाहत, यादवनगर) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बारा तासांत जेरबंद केले. हे दोघेही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्या ताब्यातून अपहरण झालेल्या मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली.

यादवनगरमध्ये राहणारा संतोष माळी हा व्यसनी असल्याने गेल्या महिनाभरापासून त्याची पत्नी निघून गेली आहे. पण, आपल्याच बहिणीने पत्नीला लपवून ठेवल्याचा संशय संतोषला होता. या रागातून काल दुपारी दुचाकीवरून आलेल्या संतोषने बहीण नकुशा कुमार चव्हाण हिच्या ताब्यातून पाच वर्षांच्या भाचीला हिसकावून घेऊन गेला होता. यावेळी ‘माझ्या पत्नीला समोर आण नाहीतर मुलीला मारून टाकू’, अशी धमकी माळी याने बहीण नकुशा हिला दिल्यानंतर नकुशा हिने माळीविरोधात राजारामपुरी पोलिसांत तक्रार दिली.

दरम्यान, घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तपास सुरू केला असता, माळी त्याचा साथीदार प्रथमेश शिंगे याला तवंदी घाटात सोडून, मुलीस घेऊन निपाणीच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या मार्गावर पाळत ठेवून माळी याला अपहृत मुलीसह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी माळीसह त्याचा साथीदार शिंगे यालाही ताब्यात घेतले असून, पोलिसांनी मुलीची सुटका करून तिच्या आईच्या स्वाधीन केले.

पुढील तपासासाठी या दोघांना राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, वैभव पाटील, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, विशाल खराडे व प्रदीप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.