
सोनम वांगचुक यांनी सोमवारी (20 जुलै) सफदरजंग रुग्णालयाच्या प्रशासनाला पत्र लिहून काही काळासाठी रुग्णालयाबाहेर जाण्याची परवानगी मागितली आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP)च्या वतीने आयोजित ‘संसद चलो’ मोर्चात सहभागी होण्यासाठी ही परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
रुग्णालयाच्या संचालकांना लिहिलेल्या पत्रात वांगचुक यांनी, “आज माझी प्रकृती पूर्णपणे चांगली आहे. माझ्या आरोग्याचे सर्व महत्त्वाचे निकषही जवळपास सामान्य आहेत. त्यामुळे कृपया मला काही काळासाठी रुग्णालयाबाहेर जाण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून संसदेकडे निघालेल्या ‘संसद चलो’ मोर्चात सहभागी होता येईल. यासाठी मी आपला आभारी राहीन,” असे म्हटले आहे.
दरम्यान, हे पत्र समाजमाध्यमांवर शेअर करत वांगचुक यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जर पोलिसांचे म्हणणे असेल की मला ताब्यात घेण्यात आलेले नाही, तर माझ्या येण्या-जाण्यावर निर्बंध का घालण्यात आले आहेत?” असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या संदेशात, “सोनम वांगचुक तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याने त्यांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र दिले आहे. जर ते पोलिसांच्या ताब्यात नसतील, तर त्यांना रोखले का जात आहे?” असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
या पत्रापूर्वीच सफदरजंग रुग्णालयाने वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत वैद्यकीय बुलेटिन जारी केले होते. त्यामध्ये त्यांच्या सर्व महत्त्वाच्या आरोग्यविषयक चाचण्या स्थिर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, रक्तातील काही निकषांवर अद्याप बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तसेच वांगचुक यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या बहुविशेषज्ञ पथकाच्या देखरेखीखाली सातत्याने उपचार सुरू असल्याचेही रुग्णालयाने सांगितले.




























































