
टी-20 वर्ल्डकप संपल्यानंतर आता टिम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळाला आहे. ‘ द वॉल’ अशी ओळख असणारे राहुल द्रविड आता टिम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी द्रविड मुख्य प्रशिक्षक होण्यामागील गमतीदार किस्सा सांगितला. टी-20 वर्ल्डकप सामने संपल्यानंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला असून राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
एका कार्यक्रमात गांगुली यांनी हा गमतीदार किस्सा सांगितला. ‘राहुल द्रविडच्या मुलाने आपल्याला फोन केला आणि म्हणाला पापा घरी खूप सक्तीने वागत आहेत. त्यांची शिस्त आणि नियम खूप कडक आहेत. त्यामुळे त्यांना तुमच्यासोबत न्या.’ द्रविडच्या मुलाची विनंती आम्ही गांभीर्याने घेतली आणि द्रविडला टिम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नेमले असे गांगुलीने सांगितले. त्यामुळे आता द्रविड जास्तवेळ घराबाहेर असेल आणि त्याच्या मुलालाही मोकळा शाव्स घेता येईल, असे गांगुली गंमतीने म्हणाला.
शारजा इंटरनॅशनल बुक फेअरमध्ये मजेत गांगुलीने हा किस्सा सुनावला. त्यानंतर गांगुली म्हणाले, आम्ही एकत्र खेळलो आहोत. टिम इंडियामध्ये आमच्या खेळाची सुरुवात एकाचवेळी झाली. त्यानंतर बराच काळ आम्ही एकत्र खेळलो आहोत. त्यामुळे द्रविडकडून होकार मिळवण्यास मदत झाली, असेही गांगुली यांनी सांगितले. अन्यथा द्रविडकडून होकार मिळवणे अवघड झाले असते, असेही ते म्हणाले.
सध्या द्रविड एनसीएची जबाबदारी सांभाळत आहेत. आयपीएल सामन्यांच्या दरम्यान दुबईत सौरव गांगुली आणि जय शाह यांनी द्रविडची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी द्रविडला टिम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी विचारणा केली होती. तेव्हा द्रविडने विचार करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याच्या शेवटीच्या दिवशी द्रविडने अर्ज दाखल केला होती. त्यावेळी त्याची निवड निश्चित मानण्यात येत होती.
आता पुढील दोन वर्षांसाठी द्रविड टिम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असतील. ते रवी शास्त्री यांची जागा घेणार आहेत. शास्त्री सुमारे सात वर्षे टिम इंडियासोबत आहेत. टी-20 वर्ल्डकपनंतर सुरू होणाऱ्या न्यूझिलंडविरोधातील सामन्यात द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी असतील. प्रशिक्षक म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली टिम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल.




























































