पालघरमध्ये एसटी ट्रकवर आदळली; २२ प्रवाशांचे प्राण सुदैवाने बचावले, सहा प्रवासी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील टेकळी गावाजवळील वाचोबा खिंडीत कोल्हापूर-बोरीवर एसटी प्रचंड वेगाने पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळली. ही घटना आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. ही धडक इतकी वेगात होती की, बसचे दरवाजे ट्रकच्या बाजूकडे अडकून बंद झाले. सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर मनोर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात बसमधील २२ प्रवासी सुदैवाने बचावले आहेत.

कोल्हापूरहून बोईसरकडे निघालेली एसटी बस आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाचोबा खिंडीच्या उतारावरून चालली होती. वाचोबा खिंड ही तीव्र उतार आणि धोकादायक वळणांसाठी ओळखली जाते. त्यामुळे वाहनचालकांना येथे विशेष सतर्कता बाळगावी लागते. याच उतारावर बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि पुढे चाललेल्या ट्रकवर प्रचंड वेगाने बस धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले. या वेळी बसमध्ये २२ प्रवासी होते. धडकेचा मोठा आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ झाला. यात सहा प्रवासी जखमी झाले.

आपत्कालीन दरवाजामुळे वाचले प्रवाशांचे प्राण

बसचे मुख्य दार ट्रकवर आदळून ब्लॉक झाले. त्यामुळे ते उघडता येत नसल्याने प्रवासी बसमध्येच अडकून पडले होते. महामार्ग सुरक्षा विभागाच्या टीमने प्रसंगावधान राखत बसचे आपत्कालीन दार उघडले आणि एकापाठोपाठ एक सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

वाहतूक कोंडी

या अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या गुजरात वाहिनीत वाहतूक कोंडी झाली. रविवार असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालघरमध्ये येतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. या दुर्घटनेमुळे वाहतूक कोंडीचे एकच चित्र पाहायला मिळाले. महामार्ग सुरक्षा विभागाने क्रेनच्या सहाय्याने बस आणि ट्रक बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.