एसटीच्या एनसीएमसी कार्डच्या वापरामध्ये तांत्रिक अडचणींचे विघ्न, प्रवाशांच्या वाढत्या तक्रारीनंतर महामंडळाकडून हेल्पलाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाने सवलतधारक महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले आहे. मात्र एनसीएमसी कार्डच्या वापरामध्ये तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. यासंदर्भातील प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळामार्फत हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत.

एनसीएमसी कार्डची नोंदणी आणि वितरण करण्यासाठी ‘ईबिक्स टेक्नॉलॉजिस’ यांच्यामार्फत एसटी आगार, बसस्थानके तसेच आगार हद्दीबाहेर अधिकृत एजंटची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील एसटी बस स्थानकांवर सध्या एनसीएमसी कार्डची नोंदणी आणि वितरण करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच एसटी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला सवलतधारी प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यासंबंधी कार्यवाही सुरू आहे. याचदरम्यान एनसीएमसी कार्डचा वापर करताना प्रवाशांना कार्ड ऑक्टिव्हेशन, कार्डमध्ये रक्कम टॉपअप करणे, कार्डमधील उपलब्ध बॅलन्स तपासणे तसेच कार्डच्या वापराबाबत इतर तांत्रिक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर एनएसडीएल पेमेंट्स बँकेमार्फत हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विविध तक्रारींचे निवारण करणार

कार्ड ऑक्टिव्हेशन, टॉपअप, बॅलन्स तपासणीसह प्रवाशांच्या इतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी एसटी महामंडळाने हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. त्यानुसार प्रवाशांनी एनसीएमसी कार्डसंबंधी कोणत्याही तक्रारींसाठी +91 22-42022190 आणि +91 22-69787303 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन महामंडळाने केले आहे.