
>> संतोष गायकवाड
दत्तूला अजिबात सायकल चालवता येत नव्हती, पण इरफान चाचाच्या सायकल मार्टवरची दोन चापं, उघडी पडलेली चेन आणि ‘व्ही’ आकाराचा शेप असलेली सायकल त्याला खूप आवडायची. तसं तर इरफान चाचाच्या दुकानात अनेक सायकली होत्या, पण ढंपर आणि पुढे दांडी नसलेल्या, ब्रेक म्हणजे आपले पायच असलेल्या सायकलीवरच दत्तूची नजर असायची. तो ‘ट्रिंग ट्रिंग’ असा तोंडानंच आवाज करत रस्त्याने धावत सुटायचा. जणू काही तो सायकलच चालवतोय असं त्याला वाटायचं. आजोबा त्याला सायकलवर बसवून चक्कर मारायला न्यायचे तेव्हा त्याला जाम मजा यायची! आजोबा सायकल दोन्ही हातांत पकडून कसे चालतात, चालताना कसे बोलतात याची नक्कल दतू घरात कुणी नसलं की, करून बघायचा.
‘‘दत्तू, अरे आधी सायकल नीट पकडायला शिक,’’ आजोबा दत्तूला सायकल शिकवत होते, पण दत्तूचे पायच पुरत नसल्याने तो रुसून एका दगडावर बसला. डोळ्यांसमोर इरफान चाचाच्या दुकानातली सायकलच त्याला दिसत होती.
एके दिवशी असाच तो इरफान चाचाच्या सायकल मार्टवर बसून त्या ढंपर नसलेल्या सायकलकडे बघत बसला होता. चाचा त्याला म्हणाला, ‘‘क्या देखता रैता रे मेरी सायकल कू? खेलने का है तो घर से पैसे ला अन् लेके जा आधा घंटा.’’
‘‘वो हमरा कू चालवना नाही जमता है…’’ दत्तूने तोडक्या मोडक्या हिंदीत उत्तर दिलं. इरफान चाचा गालातल्या गालातच हसला. ‘‘चाचा, मैं एक चक्कर लगावून येऊ का?’’ दत्तूने हळूच विचारलं. ‘‘पैसा लेके आ और ले जा,’’ चाचा बोलला. ‘‘मी येताना पैसे आणतो ना,’’ दत्तू बोलला. चाचाने मान डोलावली. दत्तूने सायकल बाहेर घेतली आणि हँडल पकडून तो सायकल लोटू लागला. ‘‘नीट खेळ रे… नही तो धडका मारते बैठेगा,’’ चाचा बसल्या जागेवरूनच ओरडला. दत्तूचं सारं लक्ष सायकलवर. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दगडाच्या मदतीने तो सायकलवर बसला आणि पायंडल मारून सायकल पुढे घेतली. पायडंलवर पाय पुरत होते. आता सायकल रस्त्यावर हळूहळू धावू लागली तसें दत्तूच्या डोक्यातले विचार पण सुरू झाले. अरेरे!’’ आणि तो समोरून येणाऱया आजोबांवर सायकल घेऊन कोसळला.
हळूहळू का होईना, शेवटी तो सायकल चालवायला शिकलाच. सहावीतल्या दत्तूला आता सायकलचं चांगलंच वेड लागलं होतं. दत्तूने आजोबांकडून दोन रुपये घेतले आणि इरफान चाचाकडून एक तासासाठी सायकल घेतली. गावापासून सहा मैलांवर एक मंदिर होते, तिथे छोटी जत्रा भरायची. दत्तूने पायंडल मारलं आणि थेट जत्रा बघायला निघाला. सायकल एका झाडाखाली उभी करून तो आधी दर्शन करायला गेला. तिथून जत्रेत मनसोक्त भटकला. नंतर सायकल लावलेल्या त्या झाडाकडे वळला. झाडाखालची सायकल गायब झालेली पाहून त्याची पुरती गाळण उडाली. आसपास कुठेच सायकल दिसेना. बराच वेळ विचारपूस केली. पण सायकल काही मिळाली नाही. शेवटी घरी परतला, तोपर्यंत रात्र बरीच झालेली. आजोबा त्याची वाट बघत होते. आजोबा चौकशी करत होते. तितक्यात इरफान चाचा ओटय़ावर आले. दत्तूला पाहताच त्यांचा आवाज चढला, ‘‘क्यो रे, सायकल किधर है मेरी. एक घंटा बोलके गया और रात होने को आया. किधर है सायकल?’’ दत्तूला रडूच कोसळलं. तो मोठय़ाने रडायला लागला. …आणि अचानक दोघेही मोठमोठय़ाने हसायला लागले. इरफान चाचाने त्याच्या बखोटय़ाला पकडून जवळच्या गोठय़ात नेलं. ‘‘माझी सायकल…’’ असं म्हणत दत्तू कोपऱयातल्या सायकलला बिलगला.
‘‘तुम्हाला कुठे मिळाली?’’ दत्तूने डोळे पुसत विचारलं. बिचारी एकटीच रडत बसली होती झाडाखाली. मी पाहिलं. तू भी नही दिखा तो घरकू लाया. अब तूही रख लेना इसे और अकेले मत छोड उसको. समझा क्या!’’ असं म्हणत इरफान चाचांनी खिशातली घंटी काढून दत्तूच्या हातात दिली. चाचा म्हणाले, ‘‘ये बिठा उसकू.’’ दत्तूने घंटी आनंदाने वाजवली आणि तोंडानेच आवाज काढला. …ट्रिंग ट्रिंग!



























































