मुलगा झाला नाही, म्हणून दोन मुलींसह महिलेची आत्महत्या

मुलगा वंशाचा दिवा ही पुरातन संकल्पना जरी मागे पडलेली असली, तरी काही ठिकाणी आजही मुलगा झाला नाही म्हणून नाराजीतून काही टोकाची पावलं उचलल्याचं अधूनमधून ऐकायला येत असतं. बाडमेर जिल्ह्यात एका महिलेनं मुलगा झाला नाही म्हणून दोन निरागस मुलींसह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

बाडमेर जिल्ह्यातील गुडामालानी विभागातील रतनपुरा गावात राहणाऱ्या कपिला (22) या विवाहित महिलेला दोन मुली होत्या. तिची लहान मुलगी तनुजा हिचा जन्म दोन महिन्यांपूर्वीच झाला होता. तिची मोठी मुलगी कबिरा चार वर्षाची होती.

आपल्याला मुलगा व्हावा, अशी कपिलाची इच्छा होती. मोठ्या मुलीच्या मागे पुन्हा मुलगीच झाल्यानं ती निराश झाली होती. एक दिवस आपल्या दोन मुलींसह तिनं तलावात उडी घेतली.

गावातील लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कपिला आणि तिच्या दोन लहान मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. शवविच्छेदनानंतर तिन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. एकाच वेळी एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे गावाकऱ्यांना धक्का बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या