
रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत हिच्या खून प्रकरणात पोलिसांकडून तिघांविरुद्ध दोषारोपत्र दाखल केले आहे. रत्नागिरी सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांच्या न्यायालयापुढे हा खटला चालविण्यात येत आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता १९ डिसेंबर २०२३ ला होणार आहे.
खटल्यातील माहितीनुसार १ सप्टेंबर २०२२ रोजी स्वप्नाली सावंत यांच्या पती सुकांत सावंत व अन्य दोघांनी घराच्या किचनमध्ये गळा आवळून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी पती सुकांत उर्फ भाई गजानन सावंत (वय ४७), रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (४३) व प्रमोद उर्फ पम्या बाळू रावणंग (रा. सर्व सडामिऱ्या, रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्वप्नाली सावंत यांच्या खून केल्यानंतर स्वप्नालीचा यांचा मृतदेह घराच्या मागील बाजूला पेट्रोल टाकून जाळण्यात आला. तर यानंतर मृतदेहाची राख व हाडे ही समुद्रात टाकण्यात आल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून न्यायालयापुढे नियमित सुनावणी सुरु झाली आहे.


























































