
>>स्वरा सावंत
पर्यावरणाचा समतोल राखणे किती गरजेचे आहे, हे काही वेगळे सांगायला नको. याबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक संस्था हल्ली पुढाकार घेत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी सध्या आवश्यकता आहे ती मानवी विचार आणि भावनेच्या प्रदूषणावर काम करण्याची. पर्यावरण संमेलनांसारख्या उपक्रमातून ‘मनोमंथन’ साधायचंय की ‘मनोरंजन’ करायचंय हे ठरवण्याची उत्तम संधी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील 28 जिह्यांतून शिर्डी येथे आलेल्या पर्यावरणप्रेमींना मिळाली आणि शिर्डीत जाहला पर्यावरणाचा जागर…
पर्यावरण जागराच्या निमित्ताने यंदाचे सहावे पर्यावरण संमेलन शिर्डीत भरवले गेले. पाचशेहून अधिक पर्यावरणप्रेमींचा सहभाग हा पर्यावरण आणि सर्वसामान्य मानवांतला दुवा साधणारा होता. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांनी ‘आदर्श सरपंच’ भास्कर पेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डीत या उपक्रमाची नांदी झाली. सध्याच्या तीव्र प्रदूषणाच्या काळात सुसह्य मानवी जीवन जगण्यासाठी स्वच्छ पाणी प्या, मुलांना शिक्षण चांगलं द्या, स्वच्छता राखा, वडीलधाऱया, म्हाताऱया माणसांना त्या-त्या गावांनी स्वीकारा, सेंद्रिय शेती करा, वृक्षारोपण करा आदी कानमंत्र पेरे पाटील यांनी दिले. 1995 पासून पेरे पाटील यांनी पाटोदा या साडेतीन हजार वस्तीच्या गावात काम सुरू केले होते. प्रत्येक माणसामागे चार झाडे लावणे आवश्यक आहे, असा विचार त्यांनी मांडला. कष्टाशिवाय पर्याय नाही. शिर्डीसारख्या देशातील धार्मिक संस्थानांनी भाविकांना रोपं भेट द्यायला सुरुवात करायला हवी. रोपांची विक्रीही करता येईल. लोक इच्छेने प्रसाद म्हणून ती सोबत नेतील, लागवड करून संगोपन करतील, असा विचार पेरे पाटील यांनी मांडला.
…तर गावे पाणीदार होतील!
रघुनंदन रामकिशन लाहोटी यांनी ‘सर्वांगीण ग्रामीण विकास’बाबत बोलताना 2012 साली दुष्काळ पाहिल्यावर एक गाव दत्तक घेतल्यापासूनची कहाणी सांगितली. जमिनीत पाणी मुरेल असं काम करायला पाहिजे असं ते म्हणाले. लाहोटी हे अरुणिमा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ही संस्था मराठवाडय़ातील जालना जिह्यात ग्राम जलसंधारण, वृक्षारोपण, शिक्षण, स्वच्छता, तरुणांमध्ये काwशल्य विकासवाढ, लहान बचत गटांद्वारे महिला सक्षमीकरण, भारतीय गायीवर आधारित सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेतमालाचे थेट विपणन आदी विषयात काम करते. या संस्थेने जलसंधारण प्रकल्पांतर्गत लोकसहभागातून 25 हून अधिक वेगवेगळ्या गावांमध्ये 250 चेक डॅम बांधलेत. ही गावे पाणी टंचाईमुक्त झालीत. आगामी काळात असेच बंधारे आणखी 100 गावांत उभारण्याचे संस्थेचे ध्येय आहे. यातून सध्या 5 हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाण्याचे संवर्धन आणि जतन केले गेले आहे. ज्याचा 10 हजारपेक्षा जास्त कुटुंबांना दीर्घकालीन लाभ होतो आहे. पाणी या विषयावर खूप काम केलं तर गावंही पाणीदार होतील. सेंद्रिय शेती वाढवण्यासाठी येणारे उत्पन्न रासायनिक खताच्या शेतीतून मिळणाऱया उत्पन्नाइतके मिळेल याची काळजी घ्यायला हवी, असंही लाहोटी यांनी नमूद केलं.
‘संत साहित्यातील पर्यावरण’
2019 च्या चिपळूण पर्यावरण संमेलनात ‘शिवकालीन पर्यावरणीय विचार’ असा विषय होता. शिवरायांनी हवामानाचा लहरीपणा लक्षात घेऊन जल व्यवस्थापन करण्यावर भर दिला. मानवाने निसर्गाला देवत्व दिलेले आहे. संतांच्या अभंगांतून आपल्याला याची जाणीव होते. संत परंपरा मानणारा, तिला प्रमाण मानून काम करणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. माणसाचा निसर्गाशी असलेला संवाद बदलत्या जीवनशैलीत आज हरवलाय. निसर्ग दुखावला गेलाय. म्हणून शिर्डीसारख्या पवित्र ठिकाणी ‘संत साहित्यातील पर्यावरण’ हा विषय निवडण्यात आला. यामुळे ‘संत साहित्याचा विचार करा, अभ्यास करा’ अशी भूमिका ‘संत साहित्यातील पर्यावरण विचार’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. विशाल फलके यांनी मांडली.
संमेलनातील ठळक वैशिष्टय़े
‘शिर्डीतील पर्यावरण’ हा विषय ग्रीन एन क्लीन शिर्डी फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित पारक यांनी मांडला. ही संस्था शिर्डीमध्ये ताजी हवा आणि स्वच्छ वातावरण मिळावं यासाठी 2012 पासून प्रयत्न करते आहे. संस्थेने आजवर 11 हजारहून अधिक झाडे लावलीत. अर्धवट तोडलेल्या झाडांना शेणाने ड्रेसिंग करावे आणि शालेय मुलांनी घरी परतताना पाण्याच्या बाटलीत शिल्लक राहिलेले पाणी झाडाला घालावं असा विचार मांडला.
संमेलनाच्या दुसऱया दिवशी डॉ. बी. जे. भोसले यांनी ‘जागतिक पर्यावरण आणि आपली जबाबदारी’ या विषयाची मांडणी केली. यावेळी प्लॅस्टिकचे दुष्परिणाम, औद्योगिक क्रांती, आर्थिक विकास आदी मुद्दय़ांचा ऊहापोह करत शाश्वत विकासासाठी काम न केल्याने आपण विनाशाच्या उंबरठय़ावर असल्याचे नमूद केले.
‘वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने सन्मानित ‘स्त्रीजन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया यांनी बोलताना निसर्ग, सामाजिक आणि मानसिक पर्यावरणविषयक ऊहापोह केला. सकस विचारांचं बीज वाढायला हवं, असं त्या म्हणाल्या.
पर्यावरण मंडळाची पर्यावरण संमेलने का आणि कशासाठी? हा प्रश्न नेहमी विचारला जातो. मुळात मंडळात कार्यरत राहिल्याने आदर्श स्थिती आणि वस्तुस्थिती यातील अंतर कमी करता येईल. यासाठी ही संस्था कार्यरत आहे. सामूहिक नेतृत्व व्यावहारिक जीवनात आणायला हवं. यामुळे समाजाला संघटित करून एका दिशेने चालण्यासाठी, पर्यावरणसारख्या क्षेत्रात मंडळ खारीचा वाटा उचलत आहे.
धीरज वारेकर, सचिव
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ



























































