गुरुद्वारा बोर्डाच्या नवनियुक्त अध्यक्षांनी अखेर पदभार स्वीकारलाच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

शासनाने नियुक्त केलेले सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपेंद्रसिंघ मिन्हास हे अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेण्यासाठी नांदेडला आले खरे. परंतु त्यांनी पदभार स्वीकारलाच नाही. याबाबत गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक मात्र तोंडघशी पडले आहेत. ज्या अधीक्षकांनी मिन्हास पदभार घेण्यासाठी येत आहेत, अशी सूचना दिली. त्याच अधीक्षकांना मिन्हास पदभार घेण्यासाठी आलेच नव्हते, असे पत्र द्यावे लागले.

गुरुद्वारा बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष भूपेंद्रसिंघ मिन्हास 18 मार्च रोजी पदभार घेण्यासाठी येणार आहेत, असे सूचीत करण्यात आले होते. अध्यक्षांची नियुक्ती शासनाने गुरुद्वारा बोर्डाच्या अधिनियमातील 11 व्या कलमात दुरुस्ती करुन केली होती. ही दुरुस्ती शीख समाजास मान्य नाही, अशा आशयाचे पत्र गुरुद्वारा बोर्डाच्या काही सदस्यांनी दिले होते. या पत्रात सदस्यांनी म्हंटले होते की, शासनाने गुरुद्वारा बोर्डाच्या अधिनियमात केलेला बदल आम्हास मान्य नसल्यामुळे ही नियुक्तीही आम्हास मान्य नाही. मिन्हास हे अध्यक्ष पदाचे सूत्रे हाती घेण्यासाठी येणार आहेत याविषयी शीख समाजाच्या भावना संतप्त आहेत. याबाबत पंचप्यारे यांनी घेतलेल्या भूमिकेस आमचा पाठिंबा आहे. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास शासन त्यास जबाबदार राहील असा इशाराही या गुरुद्वारा बोर्डाच्या सदस्यांनी दिला होता.

त्यानंतर गुरुद्वारा बोर्डाच्या अधीक्षकांनी पोलिसांना एक पत्र देवून मिन्हास यांना पदभार घेण्यास रोखण्यासाठी काही जण गुरुद्वारामध्ये अनुचित प्रकार करु शकतात म्हणून त्यांच्याविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे म्हंटले होते. तथापी आज गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष मिन्हास हे पदभार घेण्यासाठी आलेलेच नाहीत, ते शीख समाजाच्या हल्लामोहल्ला मेळाव्यासाठी एक शीख भाविक म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशा अशयाचे पत्र अधीक्षकांनी गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य मनप्रितसिंघ कुंजीवाले यांना दिले आहे. गुरुद्वारा बोर्डाच्या अधीक्षकांनी अशाच आशयाचे पत्र पोलिसांना दिले असल्यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई थांबविल्याचे कळते.

अधीक्षक म्हणतात ही तर टायपिंग मिस्टेक
याबाबत अधीक्षक गुरुविंदरसिंघ वाधवा यांच्याशी संपर्क साधला. गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष पदभार स्वीकारण्यासाठी येत आहेत. अशी सूचना आपण काही दिवसापूर्वी दिली आणि आता ते पदभार घेण्यासाठी आलेलेच नाहीत असे पत्र आपणास द्यावे लागते. हा आपला यूटर्न नाही काय, असे विचारले असता वाधवा म्हणाले की, आधीचे पत्र प्रसिध्द झाले त्यावेळी मी रजेवर होतो. माझ्या कनिष्ठ कर्मचाऱ्याची ती टायपिंग मिस्टेक होती. आता नवे पत्र पाठवून आम्ही ती चूक दुरुस्त केली एवढेच. यामध्ये यूटर्नचा प्रश्नच येत नाही, असेही वाधवा म्हणाले.