प्रशिक्षक राहुल द्रविडच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह, सततच्या पराभवामुळे टीका

राहुल द्रविडची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली तेव्हा क्रिकेटप्रेमींना त्याच्याकडून खूप आशा होत्या. कनिष्ठ स्तरावर द्रविडचा प्रक्षिक्षक रेकॉर्ड उत्कृष्ट होत, मात्र वरिष्ठ स्तरावर तो तितका यशस्वी होऊ शकला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत हिंदुस्थानी संघाला पराभव स्वीकारावा लागला ज्यानंतर त्याच्या प्रशिक्षण कौशल्यावर प्रश्न निर्माण केले जाऊ लागले आहेत.

वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान रा आटोपला आहे. या दौऱ्यात हिंदुस्थानी संघाची कामगिरी सुमार दर्जाची होती. या दौऱ्यादरम्यान हिंदुस्थानी संघाने कसोटी सामन्यांची मालिका अनिर्णित राखली.  टी-20 सामन्यांच्या मालिकेत पराभवाचे तोंड पाहावे लागले.  जो संघ या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्रही ठरू शकला नाही अशा संघाकडून 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत हिंदुस्थानी संघाला  2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. ही हिंदुस्थानी संघासाठी लाजिरवाणी बाब मानली जात आहे.  वेस्ट इंडिजने 2017 नंतर पहिल्यांदाच द्विपक्षीय टी-20 मालिकेत भारताचा पराभव केला आहे .

टी -20 मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघ आणि हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर  प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यासोबतच हिंदुस्थानी संघाचा प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. राहुल द्रविडने  जेव्हापासून भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली आहे, तेव्हापासून हिंदुस्थानी संघ सामने जिंकला कमी असून हरला जास्त आहे.

राहुल द्रविडने 2021 मध्ये या पदाची सूत्रे हाती घेतली होती.T20 विश्वचषक 2021 संपल्यानंतर रवी शास्त्री यांचा कोचिंग कार्यकाळ संपुष्टात आला . यानंतर राहुल द्रविडची भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. ज्या चुका पूर्वी झाल्या होत्या त्या पुन्हा होऊ नये आणि  हिंदुस्थानी संघाला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवता यावा अशी नव्या प्रशिक्षकाकडून अपेक्षा होती. मात्र आयसीसीच्या स्पर्धा सोडा,  द्रविडच्या कार्यकाळात हिंदुस्थानी संघ द्विपक्षीय मालिकेतही हरू लागला. मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर हिंदुस्थानी संघाची पहिली मालिका हा हिंदुस्थानात आलेल्या न्यूझीलंडविरुद्ध होती.  टी-20 मालिकेत टीम इंडियाने किवींचा 3-0 असा पराभव केला , पण कसोटी मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राहणे हे पराभवापेक्षा कमी नव्हते. या कसोटी मालिकेत भारताने न्यूझीलंडचा 1-0 असा पराभव केला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव

यानंतर प्रक्षिक्षक राहुल द्रविड हे हिंदुस्थानी संघासोबत पहिल्या विदेश दौऱ्यावर गेले होते. 2021 साली.  कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानी संघाचा 2-1 ने पराभव केला.  यानंतर वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाचा 3-0  ने धुव्वा उडवला . मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल द्रविडचे हे पहिले मोठे अपयश होते. यानंतर टीम इंडियाचा मुकाबला हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेच्या संघांशी झाला होता. तुलनेने दुबळ्या असलेल्या या संघांना हिंदुस्थानी संघाने लोळवले होते.

त्यानंतर 2022 च्या इंग्रजी उन्हाळ्यात, हिंदुस्थानी संघ 2021 कसोटी मालिकेतील उरलेला पाचवी कसोटी खेळला गेला. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने इंग्लंडच्या  बॅझबॉल’पुढे लोटांगण घातले होते. हा सामना गमावल्याने मालिका बरोबरीत सुटली होती. पाचव्या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 378 धावांची गरज होती , परंतु हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे यजमानांनी हे लक्ष्य 7 विकेट्स राखून पूर्ण केले होते. या कसोटी सामन्यानंतर इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय आणि T20  मालिका झाली  होती. ही मालिका हिंदुस्थानने जिंकली होती.

आशिया कप आणि वर्ल्ड कपमध्ये फ्लॉप शो

T20 विश्वचषक 2022 पूर्वी , आशिया चषक टी20 स्वरुपात खेळवण्यात आला होता.  आशिया चषक स्पर्धेदरम्यान, सुपर -4 स्टेजमध्ये हिंदुस्थानी संघ श्रीलंका आणि पाकिस्तानकडून पराभूत झाला होता. यामुळे हिंदुस्थानी संघ अतिम सामना न खेळताच स्पर्धेतून बाहेर पडला होता.  आता राहुल द्रविड याच्यासमोर 2022 झालेल्या टी-20 विश्वचषकाचे आव्हान होते . या स्पर्धेत हिंदुस्थानी संघ कसाबसा उपांत्य फेरीत पोहोचला होता. उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडच्या संघाने 10 गडी राखून हिंदुस्थानचा दारूण पराभव केला होता.  या स्पर्धेनंतर प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या क्षमतेवर प्रश्न निर्माण होणे साहजिकच होते. या विश्वचषकानंतर रोहित शर्मा , विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आणि संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र हे निर्णय फारसे यशस्वी ठरले नाहीत.

आयसीसी ट्रॉफीचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले

हिंदुस्थानी संघाची यानंतरची मोठी कसोटी ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आलेल्या मालिकेत होती. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कांगारूंना 2-1 ने पराभूत करत हिंदुस्थानी संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.  कसोटी मालिका जिंकल्यानंतर,  एकदिवसीय मालिकेतही टीम इंडिया चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती , परंतु ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 2-1 ने पराभव केला .

आयपीएल 2023 संपल्यानंतर,  टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा 209 धावांनी पराभव करत अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती. एकूणच राहुल द्रविडच्या कार्यकाळात टीम इंडियाला विजयापेक्षा पराभवाचा सामना जास्त करावा लागला आहे. यामुळे त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे साहजिकच आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हिंदुस्थानात विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे टीम इंडियाने विजेतेपद मिळवावे अशी तमाम हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे.  ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तर द्रविड याचा प्रशिक्षकपदाचा काळ संपुष्टात येण्याची भीती आहे.