हिंदुस्थान-नामिबिया लढत फक्त औपचारिकता, विराट सेनेचे आव्हान संपुष्टात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या वाईटावर टीम इंडियाचे भले होणार होते, पण तसे घडले नाही. न्यूझीलंडने अखेरच्या सुपर-12 लढतीत अफगाणिस्तानचा पराभव केला आणि हिंदुस्थानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे उद्या सोमवारी हिंदुस्थान-नामिबियादरम्यानची लढत म्हणजे केवळ एक औपचारिकता असणार आहे.

विराट कोहलीच्या टीम इंडियाला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून सुरुवातीच्या लढतींमध्ये पराभव पत्करावा लागला. या लागोपाठच्या पराभवानंतर हिंदुस्थानने पुढील दोन लढतींत मोठे विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र आपली उपांत्य फेरीची वाटचाल न्यूझीलंडच्या एका पराभवावर अवलंबून होती. मात्र तसे घडले नाही. हिंदुस्थानसारख्या बलाढय़ संघाचे आव्हान हे दुसऱयाच्या पराभवावर अवलंबून असणे हीच मुळात लाजिरवाणी बाब होय. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यामुळे सुरुवातीचे दोन पराभव हिंदुस्थानसाठी महागात ठरले. बलस्थान असलेल्या फलंदाजीने हिंदुस्थानचा घात केला. माफक धावसंख्येचा बचाव करताना हिंदुस्थानी गोलंदाज अपयशी ठरले. आता उद्याच्या औपचारिक लढतीत हिंदुस्थानी संघात फिरकी गोलंदाज राहुल चहरला संधी मिळण्याची शक्यता आहे. ग्रुप-1मधून इंग्लड आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरी गाठली, तर ग्रुप-2मधून पाकिस्तान व न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

आजची लढत
हिंदुस्थान वि. नामिबिया
गट 2 – दुबई, रात्री 7ः30 वाजता