टीम इंडिया ‘सातवे’ आसमान पे; विजयाच्या षटकारासह जिंकली सातवी एकदिवसीय मालिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलामीच्या लढतीत तुल्यबळ लढत दिलेल्या पाहुण्या न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात हिंदुस्थानी गोलंदाजांपुढे सपशेल शरणागती पत्करली. यजमानांनी न्यूझीलंडला अवघ्या 34.3 षटकांत केवळ 108 धावसंख्येवर गुंडाळल्यानंतर  8 गडी आणि 29.5 षटके राखून एक रुबाबदार विजय मिळविला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 2-0 फरकाने आधीच खिशात घालून सलग सातवी एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. याचबरोबर हिंदुस्थानचा हा सलग सहावा एकदिवसीय विजय होय. 18 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट टिपणारा मोहम्मद शमी या सामन्याचा मानकरी ठरला.

न्यूझीलंडकडून मिळालेले 109 धावांचे अगदीच माफक लक्ष्य टीम इंडियाने 20.1 षटकांत 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 111 धावा करीत सहज पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्मा (51) व शुभमन गिल (नाबाद 40) यांनी 14.2 षटकांत 72 धावांची सलामी दिली.  या दोघांनी मागील पाच डावांत चौथ्यांदा अर्धशतकी सलामी दिली. कारकीर्दीतील 48 वे वन डे अर्धशतक ठोकून रोहित बाद झाला. त्याच्या जागेवर आलेला विराट कोहली 11 धावा काढून माघारी परतला. मग शुभमनने आलेल्या इशान किशनच्या (नाबाद 8) साथीत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. न्यूझीलंडकडून हेन्री सिप्ली व मिचेल सँटनर यांनी 1-1 फलंदाज बाद केला.

वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडची दाणादाण

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजीपुढे दाणादाण उडाली. त्यांचे आघाडीचे पाच फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. मोहम्मद शमीने पाचव्याच चेंडूवर फिन एलनचा त्रिफळा उडविला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. मग दडपणात न्यूझीलंडचे फलंदाज बाद होत गेले. डेवोन कॉन्वेने 16 चेंडूंत 7, हेन्री निकोलसने 20 चेंडूंत 2, तर कर्णधार टॉम लॅथमने 17 चेंडूंत एक धाव केली.

मधली फळी खेळली म्हणून…

न्यूझीलंडची 5 बाद 15 अशी दुर्दशा झालेली असताना मधल्या फळीने काहीवेळ हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार केला म्हणून पाहुण्यांना धावांची शंभरी ओलांडता आली. ग्लेन फिलिप्स (36), मिचेल ब्रॅकवेल (22) व मिचेल सँटनर (27) यांनी दुहेरी धावा केल्याने न्यूझीलंडला 34.3 षटकांत 108 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. हिंदुस्थानकडून मोहम्मद शमीने 3, तर हार्दिक पंडया व वॉशिंग्टन सुंदर यांनी 2-2 फलंदाज बाद केले. मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर व कुलदीप यादव यांनाही प्रत्येकी एक विकेट घेतली. हिंदुस्थानच्या सर्वच गोलंदाजांना विकेट मिळाल्या. हार्दिकने तीन षटके निर्धाव टाकली, तर कुलदीप सोडून इतरांनीही प्रत्येकी एक षटक निर्धाव टाकून न्यूझीलंडच्या फलंदाजीला कोलदांडा घातला होता.

‘नंबर वन’पासून टीम इंडिया एक विजय दूर

न्यूझीलंडला दुसऱ्या सामन्यात 8 गडी राखून हरविल्यानंतर टीम इंडिया एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज करण्यापासून केवळ एक विजय दूर आहे. लागोपाठच्या दोन विजयामुळे मालिका जिंकलेल्या हिंदुस्थानने क्रमवारीत चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. आता हिंदुस्थानसह अव्वल स्थानी असलेला इंग्लंड व दुसऱ्या स्थानी असलेला न्यूझीलंड या तिन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 113 गुण आहेत, मात्र सरसरीच्या गणितात इंग्लंडने न्यूझीलंडला ‘नंबर वन’वरून खाली खेचले. हिंदुस्थानविरुद्धच्या पराभवामुळे न्यूझीलंडला 2 गुणांचा फटका बसल्याने त्यांना अव्वल स्थान गमवावे लागले. आता न्यूझीलंडला तिसऱ्या लढतीत हरविल्यास हिंदुस्थान 114 गुणांसह इंग्लंडचेही ‘नंबर वन’चे सिंहासन खालसा करणार आहे.