
कोरोना संसर्गाच्या तडाख्यात सापडलेल्या टीम इंडियाला अखेर आज पहिल्या वन डेला दोन दिवस उरलेले असताना दिलासा लाभला आहे. शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांच्याव्यतिरिकत अन्य क्रिकेटपटू कोरोना निगेटिव्ह ठरल्याने हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. गुरुवारी टीम इंडियाच्या खेळाडूंनी नरेंद्र मोदी स्टेडियमवर सरावाची सुरुवात केली आहे. वन डे चमूत नव्याने स्थान मिळालेल्या मयांक अगरवालला मात्र तीन दिवस विलगीकरणात राहावे लागत असल्याने संघातील निवडीसाठी पहिल्या लढतीच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने संघावरील कोरोना हल्ल्यानंतर वन डे संघात यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन यालाही स्थान दिले आहे. टीम इंडियाला येत्या 6 फेब्रुवारीपासून पाहुण्या वेस्ट इंडीज संघाविरुद्ध तीन एकदिवसीय लढतींची मालिका खेळायची आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या धक्क्यातून सावरलेल्या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी आज आपल्या ट्रेनर्ससह मैदानात सरावाला उतरणे पसंत केले. या सरावात ईशान किशनही सहभागी झाला होता. ईशान यष्टिरक्षक असून एक धडाकेबाज सलामीचा फलंदाजही असल्याने त्याचा संघात समावेश केल्याचे टीम इंडिया व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
1 हजाराव्या वन डेपूर्वीच संघावर कोरोनाची आफत
अहमदाबादमधील वेस्ट इंडीजविरुद्धची पहिली वन डे लढत ही टीम इंडियासाठी 1 हजारावी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय लढत असेल. पण या ऐतिहासिक लढतीपूर्वीच संघावर मोठा कोरोना हल्ला झाल्याने संघव्यवस्थापन चिंतेत आहे. सलामीवीर शिखर धवन, युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर कोरोनाबाधित झाले आहेत. शिवाय नेट गोलंदाज नवदीप सैनीलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. धवन, ऋतुराज आणि श्रेयस अय्यर ही तिकडी आता वन डे मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही हे स्पष्ट आहे. कारण त्यांना दीर्घकाळ विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्याशिवाय दोनदा आरटीपीसीआर चाचणीत निगेटिव्ह यावे लागणार आहे. सैनी राखीव असल्याने संघाला तशी त्याबाबत मोठी चिंता नाही. कोरोना पॉझिटिव्ह येणाऱया अन्य तिघांत क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप, सुरक्षा अधिकारी बी. लोकेश आणि राजीव कुमार यांचाही समावेश आहे.




























































