काळू, डोळखांब नदीत सातजण बुडाले; तिघांना वाचवण्यात यश, तिघांचा मृत्यू तर एक बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळत असताना पोहण्याकरिता तसेच ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणांची हौस जीवावर बेतली आहे. काळू व डोळखांबच्या चोंढे नदी पात्रात रविवारी सातजण बुडाले असून त्यातील तिघांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये काळू दुर्घटनेतील दोन ट्रेकर्स व चोंढे येथील एकजण अशा तिघांचा समावेश आहे. तर पाच तरुण हे कल्याणमधील आहेत. त्यातील एकजण अजूनही बेपत्ता आहे. धबधबे व नद्यांमध्ये पोहोण्यासाठी जाऊ नका, असे वारंवार आवाहन पोलीस करत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान धबधब्याच्या ठिकाणी व नदी काठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

रविवारी सुट्टी असल्याने पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माळशेज घाटातील काळू धबधब्यावर रमण अण्णापुरे व पवन सांडगे हे दोघेजण मौजमजा करण्यासाठी गेले होते. पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्याकरिता धबधब्याजवळ त्यांनी ट्रेकिंग सुरू केले. पण पाण्याच्या लोंढ्यामुळे ते काळू नदीत वाहून गेले. खोल प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघांचाही जीव गेला. उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान काळू धबधबा परिसरात प्रशासनाने प्रवेशबंदी लागू केली आहे.

शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात रविवारी दुपारी पावसाने अक्षरश: हाहाकार उडवला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. पूरस्थिती असतानाही कल्याणमधील आकाश देशमुख, दिनेश मांडलकर, नितेश पाटील, अजय मुरकुटे, प्रसाद इंगळे हे पाच मित्र चोंढे धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आले होते. मात्र हा दिवस त्यांच्यासाठी घातवार ठरला आहे.

भरपावसात अनेक पर्यटक चोंढे धबधब्याजवळ जमले होते. दुपारच्या सुमारास अचानक पाण्याचा प्रवाह वाढू लागला आणि त्यात आकाश देशमुख (29) हा अडकला. जीवाच्या आकांताने तो ओरडू लागला. पण खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. दिनेश मांडलकर हा देखील पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेला आहे. त्याचा उशिरापर्यंत ठावठिकाणा लागू शकला नाही. त्यांच्यासोबतचे नितेश पाटील, अजय मुरकुटे व प्रसाद इंगळे हे देखील लोंढ्यात वाहून जात होते. मात्र अन्य पर्यटकांनी आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनी धाव घेतली. बचाव पथकही दाखल झाले आणि तातडीने मदतकार्य सुरू झाले. त्यामुळे नितेश, अजय, प्रसाद हे बचावले.

लेनाडी नदीत एक बुडाला

तुफान पावसामुळे डोळखांब परिसरातील लेनाडी नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या ओमप्रकाश वर्मा हा 40 वर्षीय इसम बुडाला. ओमप्रकाश हा ठाण्यातील रहिवासी असून रविवारी सकाळी आपल्या मित्रांसोबत लेनाड येथे फिरायला गेला होता. यावेळी तो पोहायला नदीत उतरला असता पुराच्या लोंढ्यात वाहून गेला. अजून त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.