
आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या व शिवसेना शाखा चरई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ५ सप्टेंबर रोजी ठाण्याच्या जांभळी नाक्यावर हिंदुत्वाची महादहीहंडी सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेणार आहे. ढाक्कूमाक्कूमच्या तालावर विविध भागांतून मोठ्या संख्येने बाळगोपाळ येणार असून परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवणारा तसेच विजेत्या गोविंदा पथकांना लाखोंच्या बक्षिसांची लयलूट करता येणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली दहीहंडी उत्सव वाजतगाजत पार पडणार आहे.
जांभळी नाक्यावर होणाऱ्या महादहीहंडी उत्सवाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी दहीहंडी उत्सवाची परंपरा ठाण्यात सुरू केली असून हीच परंपरा यंदाही कायम राखण्यात येणार आहे. विविध भागांतून येणाऱ्या गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी अभूतपूर्व सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने मराठीचा जागरही होणार असून मानाच्या तीन दहीहंड्या हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. मुंबईतील गोविंदा पथकांसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ लाख ११ हजार १११ रुपयांची मानाची दहीहंडी लावण्यात येणार आहे.
ठाण्यातील गोविंदांकरिता धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ लाख ११ हजार १११ रुपयांची मानाची हंडी असणार आहे. महिलांसाठी माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २५ हजार रुपयांची हंडी राहील, अशी माहिती राजन विचारे यांनी दिली. या दहीहंडीला शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आदित्य ठाकरे यांची उपस्थिती
जांभळी नाक्यावरील महादहीहंडी सोहळ्यास शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार सुनील शिंदे आदी भेट देणार आहेत.
लोककला नृत्य
दहीहंडी उत्सवात मराठी, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाबरोबरच विविध लोककलांचा आविष्कार कलाकार करणार आहेत. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारदेखील उपस्थित राहून गोविंदांना प्रोत्साहन देणार आहेत.
गोविंदा पथकांसाठी ज्युपिटर हॉस्पिटलतर्फे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक रुग्णवाहिकेसह उत्सवाच्या ठिकाणी सज्ज राहणार आहे. आवश्यकता भासल्यास पाच बेड आरक्षित करण्यात आले आहेत.
विशेष दिव्यांग दहीहंडी
गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दिव्यांग गोविंदांसाठी खास हंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांग मुलांना गौरवले जाणार आहे. दरम्यान गोविंदांप्रमाणे यंदा प्रेक्षकांनाही विम्याचे संरक्षण आहे. आर्थिक मदत व विशेष पारितोषिके देऊन गौरवले जाणार आहे. दरम्यान गोविंदांप्रमाणे यंदा प्रेक्षकांनाही विम्याचे संरक्षण मिळणार आहे.






























































