
शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश भरत थोरात (27 रा. आंबेगाव खुर्द) याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश दिले आहेत.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार संबंधिताविरुद्ध मोक्का, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे. सराईत आकाश थोरात याच्यावर 2015 पासून खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव एकत्र करून गुन्हे करणे, बेकायदा हत्यारे बाळगणे, दुखापत करणे, दरोडा तयारी असे विविध प्रकारचे 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी 2017 मध्ये त्याला शहरातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार आदेशाचा भंग करून तो दोन वेळा शहरात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी एमपीडीएचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना सादर केला होता. प्रस्तावला मान्यता देत आयुक्तांनी आरोपीला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. मात्र कारवाईची चाहूल लागताच थोरात याने पळ काढला होता. पोलिसांनी त्याला देहू रोड परिसरातून ताब्यात घेतले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिदे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, सहायक पोलीस निरीक्षक मधुरा कोरोणे यांच्या पथकाने केली.


























































