
रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय म्हणून रेवस ते रेडी सागरी महामार्गाची आखणी करण्यात आली आहे. पण सागरी महामार्गही रखडला आहे. महामार्गाच्या कामाला विलंब झाल्यामुळे या सागरी महामार्गावरील मुरुड आणि दिघीला जोडणाऱया आगरदांडा खाडीवरील दोन पदरी खाडी पुलाच्या कामाचा खर्च तब्बल 137 कोटी रुपयांनी वाढल्याची आकडेवारी पुढे आली आहे.
रेवस-रेडी सागरी महामार्गावरील मुरुड तालुक्यातील आगरदांडा आणि श्रीवर्धन तालुक्यातील दिघीला जोडणाऱया आगरदांडा खाडीवर दोन पदरी मोठय़ा खाडी पुलाचे काम करण्यात येणार आहे. या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा खर्च एक हजार 315 कोटी 14 लाख 91 हजार 999 रुपये आहे. या कामाच्या खर्चात 137 कोटी 35 लाख रुपयांची वाढ झाली आहे. खाडी पुलाच्या बांधकामाच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात पुरेशी आर्थिक तरतूद झाल्याशिवाय प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू नये, असे आदेश बांधकाम विभागाने दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता असल्याचे संबंधित अधिकारी सांगतात.
100 किमीने अंतर कमी
रेवस-रेडी सागरी महामार्ग हा अतिशय निसर्गरम्य परिसरातून जातो. सुमारे 42 खाडय़ांच्या प्रदेशातून जाणारा हा महामार्ग आहे. या सागरी महामार्गामुळे मुंबईतून सिंधुदुर्ग जिह्यापर्यंतचे अंतर 105 किमीने कमी होईल. त्यामुळे वेळ व इंधनात मोठय़ा प्रमाणावर बचत होईल. त्याशिवाय कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. रायगड जिह्यातील दिघी आगरदांडा, बागमांडला-बाणकोट, करंजा, रेवस या प्रमुख पुलांची कामे होऊ शकलेली नाही. दाभोळ, केळशी, जयगड येथील मोठय़ा पुलांची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी पुलांच्या जोडरस्त्यांची कामे राहिली आहेत.
सागरी महामार्गाची वैशिष्टय़े
1.42 खाडय़ांच्या परिसरातून जाणार
2.सागरी महामार्गाचे अंतर 498 किमी
3.9 हजार कोटी रुपयांचा आराखडा





























































