
गावदेवी भाजी मार्केटच्या अग्नितांडवानंतर ठाणे पालिकेच्या अग्निशमन विभागातील वापरात असलेल्या आठ क्विक रिस्पॉन्स व्हेईकल वाहनांच्या दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतले. मात्र क्विक रिस्पॉन्स वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ठेकेदारच मिळत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे वारंवार मुदतवाढ देऊनही पालिकेच्या या निविदेला कोणीच प्रतिसाद देत नसल्याने काय ही ठाणे पालिकेची अवस्था? असे म्हणण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे.
आग, पडझड किंवा इतर दुर्घटनेच्या वेळी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागातील आठ क्विक रिस्पॉन्स वाहने चालवणे, त्यांची निगा, देखभाल आणि दुरुस्तीसाठी तब्बल ३१ कोटी ७ लाख ९६ हजार ४० रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाकडून निश्चित करण्यात आला आहे. सुरुवातीला तीन वर्ष कालावधीच्या या कामासाठी साडेतीस कोटी खर्च अपेक्षित धरला होता. सर्व विभागांच्या अहवालानुसार, किमान वेतन कायदा आणि टक्केवारी आधारित दर यांचा विचार करून २०२६-२७ मध्ये ९.८२ कोटी, २०२७-२८ मध्ये १०.८० कोटी आणि २०२८-२९ मध्ये ११.८८ कोटी असा एकूण ३२ कोटी ५१ लाख ६३ हजार ४४० रुपये खर्च अपेक्षित धरला होता. मात्र लेखापरीक्षण विभागाने उपस्थित केलेल्या मुद्यांनंतर कार्यशाळा विभागाने सुधारित अंदाजपत्रक तयार करून खर्चाची रक्कम ३१ कोटी ७ लाखांवर आणली आहे.
७२ (ब) अंतर्गत निधीचा वापर नैसर्गिक आपत्ती, तातडीची आणि नियमित अर्थसंकल्पाबाहेरील कामांसाठी करण्याची तरतूद आहे. असे असताना क्विक रिस्पॉन्स व्हेईकलच्या पुढील तीन वर्षांत होणाऱ्या खर्चासाठी ७२ (ब) अंतर्गत लुटीचा डाव रचल्याची चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी महासभेत २५० कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावेळी आयुक्त सौरभ राव यांनीही अत्यावश्यक निधी ओढाताणाखाली वापर, जेवणासारखा नाही अशी कानउघाडणी केली होती.
अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही
क्विक रिस्पॉन्स व्हेईकल चालविणे, दुरुस्ती व निगा-देखभाल या लेखाशिर्षावरील होणाऱ्या खर्चाला मान्यता दिली आहे. या प्रस्तावावर आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांचीही स्वाक्षरी आहे. दरम्यान, निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाची कोंडी झाली. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ देऊन ठेकेदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.





























































