तृतीयपंथी बनून करतात फसवाफसवी, कळव्याचे दोघे भामटे पोलिसांच्या जाळय़ात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृतीयपंथी बनून नजर उतरविण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत बोटातली मौल्यवान अंगठी चोरून पसार होणाऱया दोघा भामटय़ांना डी. बी. मार्ग पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. त्या दोघांनी एका 18 वर्षीय विद्यार्थिनीची नजर उतरविण्याच्या बहाण्याने 15 हजार किमतीची अंगठी चोरली होती.

ग्रॅण्ट रोड परिसरात राहणारी विद्यार्थिनी टोपीवाला लेन कॉर्नर परिसरातून जात असताना दोघा तृतीयपंथीयांनी तिला अडवले. मग नजर उतरविण्याचा बहाणा करत त्यांनी तरुणीच्या बोटात असलेली पांढऱया रंगाचा खडा असलेली सोन्याची अंगठी शिताफीने काढून घेतली आणि तरुणीला समजण्याआधीच पोबारा केला. थोडय़ा वेळानंतर तरुणीला बोटातील अंगठी गायब असल्याचे लक्षात येताच तिने डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

याप्रकरणी तत्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करीत असताना ते भामटे कळवा परिसरत रहत असल्याची माहिती खबऱयांकडून मिळाली. त्यानुसार कळवा पोलिसांच्या मदतीने घोलाई मंदिरच्या पाठीमागील बैठय़ा चाळीतून रितेश सोलंकी (20) आणि अमर शिंदे (23) अशा दोघांना ताब्यात घेतले.

अंगठी हस्तगत केली
आरोपींनी फसवणूक करून चोरलेली अंगठी पोलिसांनी हस्तगत केली आहे. दरम्यान, महिलांचे कपडे परिधान करून तृतीयपंथी असल्याचे भासवतो. मग समोरच्यांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक करतो अशी त्यांनी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.