
गोरेगाव पूर्वेला असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्म सिटी येथे सुरू असलेल्या बांधकामातील भिंत कोसळून दोन कामगार जागीच ठार झाल्याचं वृत्त आहे. ही भिंत प्राईम फोकस या कंपनीच्या इमारतीची होती अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
शनिवारी सायंकाळी फिल्मसिटीच्या गेट क्रमांक दोन जवळ सुरू असलेल्या बांधकामाची भिंत कोसळली. त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली तीन कामगार सापडले. त्यापैकी एकाला बाहेर काढून जखमी अवस्थेत ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं. तसंच, 108 क्रमाकांशी संपर्क साधून रुग्णवाहिकाही बोलवण्यात आली. या दुर्घटनेत सापडलेल्या तीन पैकी दोन कामगारांना मृत घोषित करण्यात आलं आहे. तसंच ढिगाऱ्याखाली अन्यही कामगार असण्याची शक्यता असल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.





























































