
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या खंडणी वसुली प्रकरणात पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व महिला पोलीस अधिकारी आशा कोरके यांना सोमवारी रात्री उशिरा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली. याचा साऱया पोलीस दलाला हादरा बसला आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंह यांनी आपल्या हाताखालील अधिकाऱयांना बेकायदेशीर आदेश दिले. याचा फटका मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या वांद्रे युनिटमध्ये काम करणाऱया नंदकुमार गोपाळे व महिला पोलीस अधिकारी आशा कोरके यांना बसला आहे.
सोमवारी 11 वाजता राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात बोलावण्यात आलेल्या या दोन्ही पोलीस अधिकाऱयांना रात्री खंडणी वसुलीच्या प्रकरणात अटक करण्यात आली असून आणखीही काही अधिकाऱयांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यात उपायुक्त अकबर पठाण यांचाही समावेश आहे. खंडणी वसुलीचे सूत्रधार परमबीर सिंह मात्र फरार आहेत.
बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मागील जुलै महिन्यात परमबीर सिंह, उपायुक्त अकबर पठाण, एसीपी श्रीकांत शिंदे, संजय पाटील, निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, बांधकाम व्यावसायिक सुनील जैन, संजय पुनमिया यांच्यावर मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सुनील जैन व संजय पुनमिया यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी एसआयटी स्थापन झाल्यावर प्रथमच दोन पोलीस निरीक्षकांना एसआयटीने अटक केली असून या अटकेने मुंबई पोलीस दल पुन्हा एकदा हादरून गेले आहे. अटक करण्यात आलेल्या निरीक्षकांना उद्या 11 वा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.




























































