Bramhakumari Ashram – आसारामप्रमाणे यांनाही शिक्षा द्या! ब्रम्हकुमारी आश्रमात आत्महत्या करणाऱ्या बहिणींची सुसाईड नोट

उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये ब्रम्हकुमारी आश्रमात दोन बहिणींनी आत्महत्या केली आहे. गळफास लावून घेत दोघींनी आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी या बहिणींनी आश्रमाच्या व्हॉटसअप ग्रुपवर सुसाईड नोट पाठवली होती. आश्रमातील चार कर्मचाऱ्यांमुळे आपल्यावर ही वेळ आल्याचे या बहिणींनी लिहिले आहे. या चौघांना आसाराम यांच्याप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी अशी विनंती या बहिणींनी केली होती. हा मेसेज वाचल्यानंतर या बहिणींचे नातेवाईक जेव्हा त्यांच्या खोलीत पोहोचले तेव्हा या दोघीजणी छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्या.

मूळच्या जगनेरच्या रहिवासी असलेल्या एकता (37) आणि शिखा (34) या ब्रह्मकुमारी आश्रमाशी दीर्घकाळापासून निगडीत होत्या. चार वर्षांपूर्वी जगनेर येथील बसई रोडवर ब्रह्मकुमारी आश्रमाची स्थापना झाली होती. यानंतर त्या आश्रमातच राहात होत्या. या दोघींचा भाऊ सोनू याने पोलिसांना सांगितले की, शुक्रवारी रात्री 11.18 वाजता रुपवासच्या ब्रह्मकुमारी आश्रमात राहणाऱ्या त्याच्या बहिणीने त्याला व्हॉट्सअॅपवर सुसाईड नोट पाठव होती. एकता आणि शिखा यांनी लिहिलेली ही सुसाईड नोट तिला आश्रमाच्या ग्रुपवर मिळाली होती. ही बातमी कळताच या बहिणींच्या कुटुंबियांनी आश्रमाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. चौकशीदरम्यान एकता आणि शिखाच्या भावाने सांगितले की दोन दिवसांपूर्वी तो या दोघींना भेटला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या मनात काय सुरू आहे किंवा त्यांना काय त्रास होतोय याबाबत काहीच सांगितले नव्हते.

जगनेर येथील ब्रह्मकुमारी आश्रमात आत्महत्या करमाऱ्या एकता आणि शिखा यांनी आठ वर्षांपूर्वी माउंट अबू येथे दीक्षा घेतली होती. दीक्षा घेतल्यानंतर त्यांना गावात केंद्र बांधण्याची जबाबदारी देण्यात आली. दोन्ही बहिणींनी आश्रमासाठी आर्थिक मदतही केली होती. सुसाईड नोटमध्ये एकता आणि शिखा यांनी आत्महत्येसाठी आश्रमातील चार कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले आहे. एकताच्या नावाने सापडलेल्या तीन पानी सुसाईड नोटची सुरुवात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना केलेल्या विनंतीने करण्यात आली आहे. दोन्ही बहिणी वर्षभरापासून तणावात होत्या, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. यासाठी केंद्रातील चार कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. आपल्या मृत्यूनंतर हे केंद्र गरीब मुलांच्या शिक्षणासाठी द्यावे, असे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. आमच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना आसाराम बापूंप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे.