
‘शिवस्वराज्य दिन हा महाराष्ट्राची अस्मिता जपणारा दिवस असून, या दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवापिढीपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर खंड तयार करण्यात येणार असून, ते सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
सातारा येथील शाहू कलामंदिर येथे आयोजित शिवस्वराज्य दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, शिवसेना उपनेते व सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील आदी उपस्थित होते. शिवस्वराज दिनानिमित्त साताऱ्यात काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल उदय सामंत यांनी समाधान व्यक्त केले.
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्षातून व त्यागातून रयतेचे राज्य उभे केले. त्यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून शासन काम करीत आहे,’ असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा युवकांनी प्रयत्न करावा,’ असे आवाहन त्यांनी केले. ‘युवकांनी यूपीएससी व एमपीएससीच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत यावे. यामुळे कुटुंबाचे परिवर्तन तर होतेच व समाजाचीही सेवा करण्याची संधी उपलब्ध होते. कोरोना संसर्ग पुन्हा वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे,’ असेही आवाहन त्यांनी केले.
‘मुलांच्या शिक्षणासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अनेक चांगल्या योजना आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आणि कार्याचे स्मरण करून पुढील वाटचाल करावी,’ असे शंभूराज देसाई म्हणाले. या कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रारंभी शिवस्वराज्य दिनानिमित्त पोवई नाका ते शाहू कलामंदिर शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सहभाग घेतला.































































