गुजरातशासित महाराष्ट्र करणार असाल तर हा महाराष्ट्र भाजपच्या पेकाटात लाथ घालेल, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

सर्व प्रकल्प गुजरातला, क्रिकेटचे सामने गुजरातला. भाजपला गुजरातला समृद्ध करायचंय तर करा. पण महाराष्ट्रातलं ओरबाडून नेताय त्याला आमचा विरोध आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र गुजरातशासित करायचा असेल तर हा महाराष्ट्र भाजपच्या पेकाटात लाथ घातल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे हे सध्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून दुपारी चिखली येथे जनसंवाद सभा पार पडली. या विराट सभेला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

”या देशात जिवाला जीव देणारी माणसं आता राहिलेली नाहीत. जीव घेणारी माणसं तयार होतायत का अशी भीती वाटू लागली आहे. हल्ली मी बघतोय ही अशी विराट गर्दी व्हावी यासाठी लोकांना बिर्याणी मागवावी लागते. मग लोकं बिर्याणी वर ताव मारतात आणि निघून जातात. शिवसेनेला तसं करावं लागत नाही. आम्हाला बिर्याणी वाटायची गरज लागत नाहीत. मी तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे. प्रेम करणारी माणसं मिळत नाही. शिवसेनेने ज्यांना मोठं केलं ती माणसं निघून गेली. पण ज्यांनी त्यांना मोठं केलं त्या माणसांना बघायला मी इथे आलो आहे. लोकांचं प्रेमाचं जे ऐश्वर्य आहे ते त्या गद्दारांच्या नशीबात नाही. शिवसेनेचं धनुष्यबाण चोरलं, पक्षाचं नाव चोरलं पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसू शकत नाही.

बुलढाणा, हिंगोली, नंदुरबार येथील अन्नविषबाधेची बातमी वाचली. दुर्दैवी घटना आहे. मुद्दाम केलं का घातपात होता अशी चर्चा होईल. साधारणत: वर्षभरापूर्वी श्रीसदस्यांचे बळी गेलेले. कॉन्ट्रॅक्टरला करोडो रुपये दिले. करोडो रुपये देऊन कान्ट्रॅक्टरचं पोट भरलं पण करोडो रुपये खाल्ल्यानंतर उन्हा तान्ह्यात जमलेल्या लोकांसाठी का नव्हती याचा तपास अ्दायप सरकारने केलेले नाही. विषबाधा झाल्यावर उपचारासाठी डॉक्टर नव्हतं. हे आपलं सरकार, बुलढाण्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. पण काय करतंय हे सरकार. काही दिवसांपूर्वी अवकाळीचा पाऊस पडला. आपत्ती आपलं सरकार असतानाही आली. पण त्या वेळेला लोकांना मदत मिळालेली. दोन लाखांपर्यंतची कर्ज माफ करायची योजना राबवली होती. मैदानात येऊन लोकांमध्ये जाऊन विचारा कुणाचा सरकार आवडलं. होऊन जाऊ दे सामना, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी भाजप मिंधे गटावर केला.

”गद्दारांना 50 खोक्यांचा हमी भाव आहे. मग माझ्या शेतकऱ्यांना का नाही. दुष्काळ उंबरठ्यावर आहे. खरीप गेला. रब्बी गेला. अनेक भागातील तरुण रोजगारासाठी शहराकडे निघाले आहेत. ग्रामीण भागातील लोकांना आधार राहिलाय रोजगार हमी योजनेचा. बुलढाण्यात अजूनही साडे पाचशे गावात कामंच सुरू झालेली नाही. आम्हाला ही माहिती मिळू शकते तर मुख्यमंत्र्यांना नाही मिळू शकत. मुख्यमंत्र्यांनी दारोदारी वणवण फिरण्यापेक्षा यावर काम करायला हवं. ही कामं करण्यापेक्षा मुख्यमंत्री लोकांना फोन करून विचारतायत की तुम्हाला ही योजना मिळाली की नाही, पंतप्रधान उज्वला योजनेने घरात गॅस आला की नाही. भाडोत्री माणसं ठेवून हे विचारलं जातंय. त्यातील एका शेतकऱ्याने थेट सांगितले की मुलाबाळासह आत्महत्या करू पण भाजपला मत देणार नाही’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”पंतप्रधानांनी लोकसभेत जे भाषण केलं ते देशाचे पंतप्रधान म्हणून करायला हवं होतं पण त्यांनी तर भाजपचे नेते म्हणून भाषण केलं. ते म्हणातात आम्ही चारशे पार जाणार. चारशे पार जाणार आहात मग एवढे का घाबरला आहात? का आमच्या लोकांच्या मागे कशाला ईडी सीबीआय लावता? ईडी सीबीआय काय तुमचे घरगडी आहेत का? मला ईडी सीबीआयला सांगायचं आहे आता त्यांचे सरकार आहे. पण लवकरच आमचं सरकार येणार आहे. तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही राजकारणात लुडबूड करू नका. नाहीतर तुमचं काय करायचं ते आम्ही ठऱवून ठेवलेलं आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

”उत्तरेतले सगळे शेतकरी रस्त्यावर उतरले आङेत. ते हक्कासाठी लढत आहेत. आत्महत्या करणं हा उपाय नाही. आत्महत्या केली का काय हाल होतात त्या शेतकऱ्याच्या घरादाराचे ते बघा. जे सांगत आहेत. आत्महत्येनंतर तुम्हाला घर दिलं असं सांगितलं जातं. पण जो शेतकरी आत्महत्या करतो त्याच्या घरावर छप्पर उडून जातं. कर्ता व्यक्ती त्यांच्यातून निघून जातो. काय करायचं आहे त्या घरादाराचं. पण तुम्ही जर असहाय्य होऊन जर आत्महत्या करणार असाल तर हे सरकार तुम्हाला चिरडणारच. उत्तरेतील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. त्यांच्यासमोर आता रणगाडे रॉकेट लाँचर आणून ठेवलेलं आहे. रस्त्यावर खिळे ठोकले आहेत. ड्रोनमधून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. दीड वर्षापूर्वीही असं आंदोलन झालं होतं. महिनाभर ते शेतकरी दिल्ली सीमेवर तंबू ठोकून बसले होकते. त्यांच्यासमोर मोदी सरकारला झुकावं लागलं होतं. याला म्हणतात जिद्द. माझ्या महाराष्ट्रातील ही जिद्द गेली कुठे. सिंदखेड म्हणजे जिजाऊंचं जन्मस्थान. जिजाऊनंनी आपल्याला आपलं दैवत दिलं. त्या दैवताने आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली. ते आपण विसरलो तर काय उपयोग. जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी जर हतबलतेने आत्महत्ये कडे वळत असेल आणि पुन्हा जर गद्दार आपल्यासमोर येऊन टिमकी वाजवणार असेल तर आपल्यााला शिवरायाचं नाव घेण्याची आपली योग्यता नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी राष्ट्रवादी व काँग्रेसोबत गेलो म्हणून माझ्यावर टीका होत आहे. पण भाजपने जो वचनभंग केला त्यामुळे मी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलो. अमित शहांनी बाळासाहेबांच्या खोलीत बसून अडीच अडीच वर्ष पद आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप करू असं म्हटलं होतं. मुख्यमंत्री हे पद आहे की नाही. तो शब्द तुम्ही मोडला. त्यानंतर मी लोकांना काय तोंड दाखवणार होतं. मी कुणाचं कधी वाईट केलेलं नाही. शब्द मोडला त्यामुळे मी संतापलो. , असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

‘शिवसेनेने मोदीजींना संकट काळात मदत केली. वाजपेयी जेव्हा मोदीजींना कचऱ्याच्या टोपीत टाकायला निघालेले तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी त्यांना वाचवलं होतं. आज राजनाथ सिंह यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एक मोठा हार मोदीजींना घातला जात आहे. त्या हारात राजनाथ सिंह देखील आपलं डोकं घुसवताना दिसत आहेत. मात्र अमित शहांनी त्यांना इशारा केल्यामुळे राजनाथ सिंहांना आज जो हार घातला ना मोठा. एक व्हिडीओ सगळीकडे फिरतोय राजनाथ सिंह तेव्हा अध्यक्ष होते. त्यांनी त्या हारामध्ये डोकं घातलं. ते त्यांना काढावं लागलं. ही यांची हुकुमशाही, एकाधिकारशाही. त्यावेळी राजनाथ सिंह भाजपचे अध्यक्ष होते. अशी वागणूक हे अध्यक्षाला देताता. तुम्ही म्हणता आम्ही घराणेशाहीविरोधात आहोत पण आम्ही तुमच्या हुकुमशाही व एकाधि्कारशाही विरोधात आहोत. अमित शहा अलिकडेच म्हणाले की यांची घराणेशाही संपवून टाकणार. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुलाला व शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे असे ते म्हणातात. हो करायचे आहे पण जनतेने मतं दिली तर होईल ना मुख्यमंत्री. मुख्यमंत्रीपद म्हणजे बीसीसीआयचं पद नाही. तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे. मग जय शहाला का योगदान आहे. मुंबईची फायनलची मॅच अहमदाबादला नेणं हे त्याचं कर्तृत्व. महाराष्ट्रात जे जे येतंय ते सगळं गुजरातकडे नेलं जातंय. गुजराला समृद्ध करा पण महाराष्ट्रातलं जसं ओरबाडून नेताय त्याला आमचा विरोध आहे. जर गुजरातशासित महाराष्ट्र करणार असाल तर हा शिवरायांचा महाराष्ट्र भाजपच्या पेकाटात लाथ घालयला मागेपुढे पहाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांना खडसावले.