खो-खोचा किंग कोण? चेन्नई-गुजरात यांच्यात आज महामुकाबला

मऱहाटमोळय़ा अल्टीमेट खो-खोला नवा विजेता लाभणार आहे. चेन्नई क्विक गन्स आणि गुजरात जायंट्सने गतविजेत्या आणि उपविजेत्यांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आणताना जेतेपदाच्या लढतीत झेप घेतली आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे दुसऱया हंगामाचा फैसलाही संघर्षपूर्ण सामन्यातच होणार हे निश्चित आहे.

गुरुवारी झालेले दोन्ही सामने थरारक झाले. एका सामन्यात गुजरातने जायंट कामगिरी करताना गतविजेत्या ओडिशा जगरनॉट्सचे जेतेपद राखण्याचे स्वप्न धुळीस मिळवले तर चेन्नई क्विक गन्सने तेलुगू योद्धाजला सलग दुसऱयांदा अंतिम फेरी गाठू दिली नाही. चेन्नईचा खेळ पाहाता हा संघच जेतेपदाचा अस्सल दावेदार मानला जातोय. या मोसमात सर्वाधिक आठ विजय त्यांच्याच नावावर आहेत. गुजरातनेही सात विजय नोंदविले आहेत.

या मोसमातील सारे विक्रम चेन्नईच्याच नावावर आहेत. सर्वाधिक विजय, सर्वाधिक आक्रमणाचे गुण, सर्वाधिक संरक्षणाचे गुण साऱयाच क्षेत्रात तेच पुढे आहेत. त्यांचा रामजी काश्यप या मोसमातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय. तोच सर्वोत्तम आक्रमक आणि तोच सर्वोत्तम बचावपटूही ठरलाय. त्याच्या इतके गुणही कुणीच घेऊ शकलेला नाही. उद्या अंतिम सामन्यातही तोच प्रतिस्पर्धी संघासाठी सर्वात मोठा अडसर असेल.

अंतिम सामन्यात संघांची नावे चेन्नई आणि गुजरात असली तरी उद्याचा सामना महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्रच असेल. दोन्ही संघातील निम्म्यापेक्षा अधिक खेळाडू हे महाराष्ट्राचेच आहेत. चेन्नईचे कर्णधारपद अमित पाटीलकडे आहे तर अक्षय भांगरे गुजरातचा कर्णधार आहे. त्यामुळे उद्या जेतेपदासाठी महाराष्ट्राच्याच खेळाडूंमध्ये खरी खेचाखेच असेल. कोणताही संघ जिंकला तरी जिंकणार महाराष्ट्रच. त्यामुळे महाराष्ट्राचा कोणता खेळाडू  आपल्या संघाला खो-खोचा किंग बनवतो ते उद्याच कळू शकेल.