Ultimate Kho-Kho: गुजरात-चेन्नई यांच्यात अंतिम झुंज

गतविजेते आणि उपविजेत्यांना उपांत्य फेरीतच धक्का

गतविजेत्या ओडिशा जगरनॉट्सला आपले जेतेपद राखण्यात अपयश आले. अत्यंत चुरशीच्या लढतीत गुजरात जायंट्सने 27-29 असा अवघ्या दोन गुणांनी पराभव करत अल्टीमेट खो-खोच्या दुसऱया हंगामाच्या अंतिम फेरीत धडक मारली. तसेच गत उपविजेत्या तेलुगू योद्धाजला चेन्नई क्विक गनने 31-29 असे नमवत दुसरा उपांत्य सामना जिंकला. पहिल्या हंगामाच्या विजेत्या आणि उपविजेत्या संघाला उपांत्य फेरीतच पराभवाचा धक्का बसल्याने आता अल्टीमेट खो-खोला नवा विजेता लाभणार आहे. आता जेतेपदाची झुंज शनिवारी रंगेल.

साखळी गुणतालिकेत सहा-सहा विजय मिळविणाऱया ओडिशा आणि गुजरात यांच्यात उपांत्य लढतीत जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. दोन्ही संघांमध्ये प्रत्येक डावात प्रचंड चपळ खेळ पाहायला मिळाला. कधी ओडिशा तर कधी गुजरात आघाडी घ्यायचा. शेवटच्या डावात ओडिशा जगरनॉट्सने गुजरातवर 24-19 अशी 5 गुणांची नाममात्र आघाडी घेतली जी पहिल्या टर्नइतकीच होती व हे आव्हान गुजरात जायंट्ससाठी अवघड नव्हते. पण ओडिशा जगरनॉट्सने गुजरात झुंजवले, पण अखेर बाजी गुजरातच्या जायंट्सनेच मारली.

दुसरा उपांत्य सामनाही संघर्षपूर्ण झाला. स्पर्धेत सर्वाधिक विजय मिळवणाऱया चेन्नई क्विक गन्स उपांत्य लढतीत सरस खेळ करणार अशीच अपेक्षा होती आणि त्यांनी तसाच खेळ केला. या स्पर्धेत चेन्नईला केवळ तेलुगू योद्धाजनेच हरवले होते. त्यामुळे चेन्नईने प्रत्येक डाव चतुराईने खेळत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. तेलुगूच्या खेळाडूंनीही चेन्नईला रोखण्यासाठी जिवाचे रान केले, पण त्यांचे प्रयत्न थोडक्यात कमी पडले आणि त्यांचे जेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. पहिल्या मोसमात ते अंतिम फेरीत हरले होते, तर यंदा उपांत्य फेरीत पराभूत झाले. चेन्नईने त्यांना 31-29 असे नमवले.