
राज्यावर कोरोनाचे संकट आलेले असतानाच आता गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असणाऱया अवकाळी पावसाने पश्चिम महाराष्ट्रात हातातोंडाशी आलेल्या पिकांची दाणादाण उडवली आहे. सातारा जिह्यातील वाठार स्टेशन आणि खटाव तालुक्यात आज मोठय़ा प्रमाणावर गारपीट झाली. सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्ग दोन किलोमीटर अंतरावरील रस्ता बर्फाने माखून गेला होता. सांगली जिह्यातील आटपाडी तालुक्यातही आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. नगर शहरासह जिह्यातही आज वादळी वाऱयासह जोरदार पाऊस झाला. सोलापूर शहर व जिल्हय़ात वादळी व अवकाळी पावसामुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका पंढरपूर तालुक्याला बसला असून, 3800 शेतकऱयांचे फळबागांचे नुकसान झाले आहे. रब्बी पिकाबरोबरच द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, पपई फळबागांचे नुकसान झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात फळबागांचे नुकसान
जिल्हय़ात वादळी व अवकाळी पावसामुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका पंढरपूर तालुक्याला बसला असून, 3800 शेतकऱयांचे फळबागांचे नुकसान झाले आहे. रब्बी पिकांबरोबरच द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, पपई फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोलापूर जिल्हय़ात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. जिल्हय़ातील 18 गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यात पंढरपूर तालुक्यासह मंगळवेढा, बार्शी तालुक्यातील फळबागांचे व रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. यात 2300 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, पपई, लिंबू फळबागांसह रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत जवळपास 3800 शेतकऱयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पंढरपूर तालुक्यात 83 टक्के नुकसान झाले आहे. मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडीत वीज पडून तीन जनावरे दगावली आहेत.
नगर जिल्ह्यात तुफान पाऊस
नगर जिल्ह्याच्या अनेक भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विद्युत पुरवठासुद्धा खंडित झाला होता. नगर शहरातही सायंकाळी जोरदार वाऱयासह पावसाने हजेरी लावली.
गेल्या आठवडाभरापासून नगर जिह्यात तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या पुढे गेला होता, त्यातच हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होता. आज दुपारी कोपरगाव, शिर्डी, संगमनेर परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱयासह आलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले.
सातारा जिल्ह्यात गारपीट; रस्ते बर्फाने आच्छादले
सातारा जिल्ह्यात गेले दोन दिवस अवकाळी पाऊस पडत आहे. आज सकाळपासून उष्णता वाढल्याने पावसाचा अंदाज वर्तवला जात होता. आज अचानकपणे वाठार स्टेशन, विखळे, जाधववाडी गावांवर वादळी वाऱयासह विजांच्या कडकडाटासह अर्धा तास पाऊस झाला. सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्ग दोन किलोमीटर अंतरावर बर्फाने माखून गेला होता. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील कायमस्वरूपी दुष्काळी गाव अशी ओळख असलेल्या वाठार स्टेशन गावावर आज वरुणराजा चांगलाच बरसला. आज दुपारी अर्धा तास पडलेल्या गारांच्या पावसाने या गावातील संपूर्ण शेतशिवार व रस्त्यावर बर्फाचा खच साचला होता.
सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी असणाऱया खटाव तालुक्याच्या उत्तर भागात आज वळवाच्या पावसाने प्रचंड नुकसान केले. आज दुपारी तीनच्या सुमारास प्रचंड वारा व विजेच्या गडगडाटासह गारांच्या पावसाने मोळ, पसूचा मळा या भागात प्रचंड गारपीट झाली. यामुळे फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. गारांचा खच शेतात आणि रस्त्यावर पडलेला होता. गारपिटीमुळे शेतामधील पाईपलाईनदेखील फुटल्या. आंबा, शेवगा, चिकू यासारख्या फळबागांचे मोठे नुकसान झाले.
आटपाडीत वादळी वाऱयासह पाऊस
सांगलीचा दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या आटपाडीच्या झरे परिसरात मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. या परिसरात सकाळपासूनच उष्णता जाणवत होती. उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास येथे जोराचा वारा सुरू झाला. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. साधारण अर्धा ते पाऊण तास हा पाऊस होता. या अवकाळी पावसामुळे येथे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

































































