
30 नोव्हेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद शहरात राहणाऱ्या अभिषेक अहलुवालिया याचे अंजली नावाच्या तरुणीसोबत लग्न झाले होते. नवीन नवीन संसार फुलत असतााच नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अभिषेकचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आपल्या पतीच्या मृत्यूचा धक्का पचवू न शकलेल्या 22 वर्षीय अंजलीने पतीच्या अंत्यसंस्काराआधीच आत्महत्या केली.
सोमवारी अभिषेक व अंजली हे फिरायला म्हणून दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयात गेले होते. तिथे अभिषेकला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे अंजलीने त्याच्या मित्रांना व नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यानंतर अभिषेकला एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अभिषेकला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले व सफदरजंग रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र सफदरजंग रुग्णालयात नेण्याआधीच अभिषेकचा मृत्यू झाला होता.
अभिषेकच्या मृत्यूचा अंजलीला जबरदस्त धक्का बसला होता. शवविच्छेदनानंतर अभिषेकचे पार्थिव शरीर घरी आणण्यात आले. त्यावेळी अंजलीचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. मात्र कुणाला काही कळायच्या आत अंजली धावत घराबाहेर गेली व तिने थेट बिल्डिंगचा सातवा माळा गाठला. तिच्या मागून काही नातेवाईकही धावत गेले. मात्र ते तिथे पोहचण्यापूर्वीच अंजलीने सातव्या माळ्यावरून उडी मारली. तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉ़क्टरांनी तिला मृत घोषीत केले.
त्यानंतर अंजलीचा मृतदेह देखील घरी आणण्यात आला व अंजली अभिषेक दोघांवरही एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.




























































