भाजप प्रदेशाध्यक्षांविरोधात आमदारांनी भरला हुंकार, ‘देशद्रोही’ म्हणत पदावरुन हटवण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सध्या पाच राज्यातील निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सोमवारी 14 फेब्रुवारी रोजी उत्तराखंड, गोवा आणि पंजाबमध्ये मतदान पार पडले. तसेच उत्तर प्रदेशमध्ये देखील दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरळीत पार पडले. भाजपची सत्ता असलेल्या उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Election 2022) एकूण 62.5 टक्के मतदान झाले. मात्र पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्न पाहणाऱ्या भाजपमधील खदखद बाहेर आली असून उमेदवारांनी थेट प्रदेशाध्यक्षांनाच हटवण्याची मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तराखंडचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक (Uttarakhand BJP chief Madan Kaushik) यांनी भाजपच्याच उमेदवारांविरोधात काम केले. माझ्या विरोधात उभ्या असणाऱ्या बसपाच्या उमेदवारांना त्यांनी समर्थन दिले. ते देशद्रोही आहेत. मी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करतो, असे लक्सरचे आमदार आणि विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार संजय गुप्ता (anjay Gupta, MLA from Laksar) यांनी म्हटले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

70 जागांसाठी मतदान

उत्तराखंडमध्ये 70 विधानसभा जागा असून या सर्व जागांसाठी सोमवारी मतदान पार पडले. सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी 6 वाजेपर्यत सुरू होती. राज्यात एकूण 62.5 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. कोरोनामुळे मतदान कमी झाले असले तरी मतदारांचा उत्साह मात्र प्रचंड दिसला.

2017 चा रेकॉर्ड कायम

यंदा बंपर वोटिंग झाले असले तरी 2017 चा रेकॉर्ड मात्र तुटला नाही. 2017 मध्ये राज्यात विक्रमी 65.64 टक्के मतदान झाले होते. परंतु दिलासादायक म्हणजे सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. राज्यात सर्वत्र शांततेत मदतान पार पडल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले.

उत्तराखंडमधील मतदानाची आकडेवारी

2022 – 63.5 टक्के
2017 – 65.56 टक्के
2012 – 67.22 टक्के
2006 – 59.50 टक्के
2002 – 54.34 टक्के