
घरोघरी कोरोना लसीकरण करण्याची परवानगी मागणारा पालिकेचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला आहे. घरोघरी लसीकरण सुविधा देण्याबाबत सध्यातरी कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करतानाच दोन कि.मी. परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईत सद्यस्थितीत सार्वजनिक आणि खासगी रुग्णालये मिळून 100 लसीकरण केंद्रे आहेत. मुंबईत कोरोना वाढत असल्यामुळे लसीकरणाचाही वेग वाढावा म्हणून पालिकेने घरोघरी लसीकरण करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. यानुसार निवासी संकुलांनी मागणी केल्यास खासगी रुग्णालयांमार्फत घराजवळ लसीकरण करण्याची सोय करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पाठवला होता. ज्येष्ठ नागरिक, अपंगांना लसीकरण केंद्र दूर असल्यास त्रास सहन करावा लागत असल्यामुळे घरोघरी लसीकरण करण्याची परवानगी पालिकेने मागितली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा प्रस्ताव फेटाळला आहे.
केंद्रीय आरोग्य विभाग म्हणतो…
सद्यस्थितीत परवानगी दिलेल्या लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी लस देण्याआधी लाभार्थ्यांसाठी व्यवस्था आहे. लस दिल्यानंतर होणाऱया परिणामांवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टर, तज्ञ, आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतात. मात्र घरोघरी लस देण्यास सुरुवात केल्यास अशी व्यवस्था उभारली गेली नाही तर विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सद्यस्थितीत घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव नाकारत असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.






























































