वैभव नाईक यांच्या मतदारसंघात सरपंचांनाही एसीबीची नोटीस! आज रत्नागिरीत सरपंचांची होणार चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी सुरू असतानाच आता त्यांच्या मतदारसंघातील शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींनाही एसीबी विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून झालेल्या कामांची चौकशी केली जाणार आहे. सोमवारी 30 जानेवारीला संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंचांना आमदार नाईक यांच्या फंडातून झालेल्या कामांच्या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, अशा आशयाची नोटीस एसीबी रत्नागिरी विभागाने बजावली आहे. ग्रामपंचायतींच्या सरपंचांना एसीबीने अशाप्रकारची नोटीस बजावण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच वेळ आहे.

आमदार वैभव नाईक हे शिवसेनेचे निष्ठावंत आमदार असून एसीबीच्या आडून त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीमार्फत मालमत्तेसंदर्भात काही दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. तेव्हा त्यांनी चौकशीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. अलीकडेच त्यांच्या मालमत्तेसंदर्भात एसीबी विभागाकडून मोजमापे घेण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या मतदारसंघातील शिवसेनेकडे असलेल्या ग्रामपंचायतींना थेट रत्नागिरी एसीबी विभागाकडून नोटिसा जारी केल्या आहेत.

आमदार वैभव नाईक यांच्या फंडातून झालेल्या कामांबाबत चौकशी करून जबाब नोंदविण्यात येणार आहेत. संबंधित कामांच्या सर्व कागदपत्रे, बँक खाते व अन्य आवश्यक कागदपत्रांसह 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय रत्नागिरी येथे उपस्थित राहावे, असे ग्रामपंचायतींच्या सरपंचांना बजावण्यात आलेल्या नोटिसीत नमूद केले आहे.